सावदा नगर पालिका निवडणूक : छाननीत 35 अर्ज बाद; भाजपाच्या रंजना भारंबे बिनविरोध
सावदा नगर पालिका निवडणूक : छाननीत 35 अर्ज बाद; भाजपाच्या रंजना भारंबे बिनविरोध
लेवाजगत न्युज सावदा:- सावदा नगर पालिका निवडणुकीसाठी दाखल झालेले एकूण १५५ अर्ज दिनांक १८ रोजी सकाळी ११ वाजता पालिका सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत छाननीस घेण्यात आले. नगराध्यक्ष पदासह दहा प्रभागांतील २० जागांसाठी आलेल्या अर्जांची तपासणी करण्यात आली. यात नगराध्यक्ष पदाचे २ अर्ज तर नगरसेवक पदाचे ३३ अर्ज छाननीत बाद करण्यात आले. विशेषतः पक्षाकडून ए–बी फॉर्म न जोडलेल्या बहुतेक अर्जांची छाननीदरम्यान नोंद बाद झाली.
प्रभाग ७ अ – रंजक घडामोड, भाजपाच्या रंजना जितेंद्र भारंबे बिनविरोध
प्रभाग ७ अ मध्ये एकूण तीन अर्ज आले होते.
1. रंजना जितेंद्र भारंबे (भाजप)
2. हेमांगी राजेंद्र चौधरी (भाजप)
3. रेखा राजेश वानखेडे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
यापैकी हेमांगी चौधरी व रेखा वानखेडे यांनी ए–बी फॉर्म न जोडल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद झाले. परिणामी भाजपाच्या रंजना भारंबे या बिनविरोध निवडून आल्या, मात्र अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.
प्रभाग २ ब व १० ब – तीन अपत्य प्रकरणावरून तणाव
प्रभाग २ ब
उमेदवार आसमाबी शेख अल्लाबक्ष यांच्या विरोधात तब्बस्सुम बानो फिरोज खान यांनी ‘तीन अपत्य’ या कारणावर हरकत दाखल केली.
प्रभाग १० ब
उमेदवार शेख अल्लाबक्ष शेख नजीर (गुडू शेठ) यांच्याविरुद्ध फिरोज खान हबीबउल्ला खान पठाण यांनी याच कारणावर हरकत नोंदवली.
दोन्ही उमेदवार हे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) असून पती–पत्नी असल्याने या दोन हरकतींमुळे पालिकेबाहेर समर्थकांमध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत चोख बंदोबस्त केला.
सायंकाळी ६ वाजता हरकतीचा निकाल देताना निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी ‘तीन अपत्य’ नियमाखाली दोन्ही उमेदवारांचे अर्ज बाद ठरविले. निर्णयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली, तर हरकत घेणाऱ्या बाजूच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत