वाडी किल्ल्याजवळ दुचाकी अपघात; पाळधी येथील सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू
वाडी किल्ल्याजवळ दुचाकी अपघात; पाळधी येथील सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू
लेवाजगत न्युज जळगाव( नितीन इंगळे):-
जामनेर तालुक्यातील पाळधी येथील दोन युवकांचा वाडी किल्ला परिसरात झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल उघडकीस आली आहे.
मृतांमध्ये कल्पेश समाधान माळी (17) व शुभम भिका माळी (21) यांचा समावेश असून दोघं सख्खे चुलत भाऊ आहेत.
मारुती रायाचे दर्शनासाठी निघाले आणि परतच आले नाहीत
शनिवारी पहाटे सुमारे 4 वाजता हे दोघे शिरसाळा येथे मारुती रायाचे दर्शन घेण्यासाठी पाळधीहून निघाले होते. बोदवड रोडवरील मालदाभाडी (शिवनेरी ढाबा) परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
धडकेमुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला खोल नालीत कोसळली. यात दोघांच्या गळ्याला व डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
दोघं मुलं घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरु केला. अखेर रस्त्याच्या कडेला दुचाकी दिसून आल्याने तेथील परिसरात पाहणी केली असता दोघांचेही मृतदेह आढळले.
दोन्ही मृतदेह जामनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले असून जामनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली आहे. अज्ञात वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत