Contact Banner

१०० टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शस्त्रक्रियेचे गोल्डन अवर्स ठरले महत्वाचे


100-takke-raktapurvatha-khandit-zalelya-mahilevar-hrudayachi-yashasvi-shastrakriya-dr-ulhas-patil-rugnalayat-golden-hours-mahatvache


१०० टक्के रक्तपुरवठा खंडीत झालेल्या महिलेवर हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील शस्त्रक्रियेचे गोल्डन अवर्स ठरले महत्वाचे

लेवाजगत न्यूज जळगाव : भुसावळ येथील ६० वर्षीय महिलेवर हृदयाला रक्तपुरवठा पूर्णपणे खंडीत झालेल्या अत्यंत गंभीर अवस्थेत डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. वेळेत मिळालेल्या तातडीच्या उपचारांमुळे रुग्णाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असून ही शस्त्रक्रिया हृदयरोग उपचार क्षेत्रातील एक महत्त्वाची कामगिरी ठरली आहे.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील सुरेखा मोरे नामक ६० वर्षीय महिलेला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. त्यासोबतच सतत उलट्या होत असल्याने रुग्णाची प्रकृती अधिकच खालावत होती. वेदना वाढत गेल्याने व प्रकृती गंभीर होत चालल्याने नातेवाइकांनी तातडीने रुग्णाला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच हृदयालयाचे प्रमुख डॉ. वैभव पाटील यांच्या पथकाने ईसीजीसह इतर अत्यावश्यक तपासण्या तात्काळ सुरू केल्या. ईसीजी अहवाल व रक्ततपासण्यांमधून रुग्णाला तीव्र हृदयविकाराचा झटका (मेजर हार्ट अटॅक) आल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासणीसाठी करण्यात आलेल्या अँजिओग्राफीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख वाहिनी तब्बल १०० टक्के ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. हा अत्यंत जीवघेणा प्रकार असून काही मिनिटांचा उशीरही प्राणघातक ठरू शकतो, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोणताही विलंब न करता तातडीने अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. हृदयालयाचे प्रमुख तथा डीएम कार्डीओलॉजीस्ट डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. सिध्देश्वर खांडे, डॉ. आकाश पवार यांनी महिला रूग्णावर यशस्वीरित्या एन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया केली.  ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीत स्टेंट बसवून हृदयाला पुन्हा सुरळीत रक्तपुरवठा सुरू करण्यात आला.शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. छातीतल्या वेदना कमी झाल्या, श्वसन सुरळीत झाले आणि रुग्णाला दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेसाठी सुधाकर बिराजदार यांच्यासह नर्सिंग स्टाफने सहकार्य केले. तसेच शस्त्रक्रियेनंतरची काळजी डॉ. मनमिता रेड्डी, डॉ. रिषभ पाटील, डॉ. झिशान यांनी घेतली.


छातीत दुखणे, उलट्या, घाम येणे, धाप लागणे ही हृदयविकाराची महत्त्वाची लक्षणे असू शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाणे अत्यंत गरजेचे आहे. या रुग्णाच्या बाबतीत वेळेत रुग्णालयात आणल्यामुळे आम्हाला तात्काळ उपचार करता आले आणि तिचे प्राण वाचवणे शक्य झाले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, अत्याधुनिक कॅथलॅब आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथक यामुळे आज अशा गंभीर हृदयविकारांवरही यशस्वी उपचार होत आहेत. मात्र नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे, नियमित तपासण्या करणे आणि लक्षणे दिसताच उपचार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

- डॉ. सिध्देश्वर खांडे, निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.