Contact Banner

सतरा वर्षीय मुलीने संपवलं जीवन; घटनास्थळी आढळली शेवटची चिठ्ठी, कारण ठरला 'बाप', काय घडलं?


 सतरा वर्षीय मुलीने संपवलं जीवन; घटनास्थळी आढळली शेवटची चिठ्ठी, कारण ठरला 'बाप', काय घडलं?


लेवाजगत न्युज नांदेड :- नांदेड गाव परिसरात जिजाबाईनगर येथे १७ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेत आहे,’ असा उल्लेख तिने लिहिलेल्या चिठ्ठीत मिळाला. मृत मुलीचे नाव संजीवनी जीवन रोडे असून, तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून जीवन गणपती रोडे (वय ४५) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.


नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडे कुटुंब दहा वर्षांपासून जिजाबाईनगर येथे राहते. रोडे कुटुंबीय मूळचे बीड जिल्ह्यातील असून, कामानिमित्त ते पुण्यात राहतात. रोडे दाम्पत्याला पाच मुले आहेत. दोन मुलींचे विवाह झाले आहेत, तर संजीवनी, तिची मोठी बहीण आणि ११ वर्षांचा भाऊ आई-वडिलांसह राहत होते. संजीवनीची आई शीला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतात.


तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जीवन रोडे यांना दारूचे व्यसन असून, ते मुलांना वारंवार शिवीगाळ करून त्रास देतात. तक्रारदार २९ सप्टेंबरला सकाळी घरकामासाठी बाहेर गेल्या. त्या वेळी जीवन आणि तीन मुले घरी होती. दुपारी मोठी मुलगी कामावर गेल्यावर घरात फक्त संजीवनी, तिचा लहान भाऊ आणि वडील राहिले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शीला रोडे यांना मोबाईलवर फोन आला. यावेळी त्यांना संजीवनीने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.


घटनास्थळी संजीवनीने लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात तिने वडिलांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.