Contact Banner

हिरियूरजवळ भीषण अपघात; बस-कंटेनरच्या धडकेत 17 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती



 हिरियूरजवळ भीषण अपघात; बस-कंटेनरच्या धडकेत 17 जणांचा होरपळून मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

 

 लेवाजगत न्यूज चित्रदुर्ग:-

जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर पहाटे भीषण अपघात घडला. बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत लागलेल्या आगीत 17 प्रवासी जिवंत जळाले, तर कंटेनर ट्रक चालकाचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, खासगी बस बंगळूरूहून गोकर्णाकडे जात होती, तर कंटेनर ट्रक बंगळूरूकडे निघाला होता. पहाटे सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास कंटेनर ट्रकने डिव्हायडरला धडक दिली आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या बसला जोरदार धडक दिली. धडकेनंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसला भीषण आग लागली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 32 प्रवासी होते. बहुतेक प्रवासी झोपेत असतानाच काही क्षणांत आगीचा भडका उडाला. त्यामुळे अनेकांना बसमधून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण घटनेत 17 प्रवासी आगीत होरपळून मरण पावले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल व बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आगीवर नियंत्रण मिळवून बचावकार्य राबवण्यात आले. जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या दुर्घटनेवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला असून, जखमींवर योग्य उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपघातानंतर मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून अनेकांचे मन हेलावून गेले आहे.

ही घटना संपूर्ण राज्याला हादरवणारी असून, महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.