Contact Banner

सरकारने भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला : चिंचपाडा येथे भूमिपुत्रांचा काळ्या फिती लावून सरकारविरोधात तीव्र निषेध

 

sarkarne-bhumiputranchya-kesane-gala-kapla-chinchpada-yethe-bhumiputranchya-kalya-fiti-lavun-sarkarvirodhit-tivra-nishedh

सरकारने भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला :
चिंचपाडा येथे भूमिपुत्रांचा काळ्या फिती लावून सरकारविरोधात तीव्र निषेध

उरण लेवाजगत न्यूज प्रतिनिधी सुनील ठाकूर-

उरण तालुक्यातील चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी काळ्या फिती लावून सरकारचा तीव्र निषेध केला. आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव न दिल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनात आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “सरकार सत्तापिपासू झाले आहे. सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात दंग असून सत्तेच्या नशेत जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहेत. उरणला १९३० च्या जंगल सत्याग्रहाचा गौरवशाली इतिहास आहे. १९८४ च्या ऐतिहासिक लढ्याचे प्रणेते असून त्या आंदोलनात पाच हुतात्मे झाले. साडेबारा टक्केचा कायदा देशभर लागू होण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. ओबीसी मंडल आयोगाच्या लढ्यातही ते अग्रणी होते.”

“असे असतानाही आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे. तीन वेळा आश्वासन देऊनही सरकार भूमिपुत्रांची सरळ फसवणूक करत आहे. विमानतळाचे उद्घाटन झाले, आज विमानसेवाही सुरू झाली; तरीही सरकार झोपेचे सोंग घेत आहे. भूमिपुत्रांच्या छाताडावर उभ्या राहिलेल्या विमानतळाला दिबांचे नाव देण्याबाबत सरकारला नेमकी कशाची अॅलर्जी आहे?” असा सवाल त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले, “येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भूमिपुत्रांनी सत्ताधाऱ्यांना पहिला झटका द्यायला हवा. दिबांचे पुत्र यांनी भाजपपासून फारकत घ्यायला हवी होती; मात्र तसे घडले नाही. सरकारने एकप्रकारे भूमिपुत्रांचा केसाने गळा कापला आहे. मात्र सर्वसामान्य जनता कोणत्याही क्षणी पेटून उठेल आणि सरकारला नेस्तनाबूत करेल, हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे तातडीने विमानतळाला दिबांचे नाव द्यावे.”

या आंदोलनावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, निलेश पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत सरकारविरोधात तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
आंतरराष्ट्रीय विमानतळ——याला दि. बा. पाटील यांचे नाव देईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.