अहिल्यानगरमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, भाजपा उमेदवाराच्या पतीला अटक; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत!
अहिल्यानगरमध्ये नृत्यांगनेची लॉजवर आत्महत्या, भाजपा उमेदवाराच्या पतीला अटक; रोहित पवारांची पोस्ट चर्चेत!
वृत्तसंस्था अहिल्यानगर-गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगरमध्ये झालेल्या एका आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात एक बहुचर्चित नृत्यांगनेनं आत्महत्या केली असून त्या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीचा संबंध थेट भाजपाशी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार यांनी यासंदर्भात केलेली एक सोशल पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी संबंधित नृत्यांगनेबाबत व या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तीबाबत माहिती दिली असून भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. हीच का पार्टी विथ डिफरन्स? असा सवालदेखील रोहित पवार यांनी केला आहे.
https://x.com/RRPSpeaks/status/1996962480535593345?t=rBIgBG0G3c4SjEg3rnRmLA&s=19
काय आहे नृत्यांगणा आत्महत्या प्रकरण?
सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमध्ये एका बहुचर्चित नृत्यांगनेनं एका लॉजवर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. सदर नृत्यांगना अहिल्यानगरच्या जामखेड शहरातील तपनेश्वर भागात वास्तव्यास होती. शुक्रवारी सकाळी बाजारात जात असल्याचं सांगत सदर ३५ वर्षीय महिला घराबाहेर पडली, पण बराच वेळ होऊनह न परतल्यामुळे तिला सोडणाऱ्या रिक्षाचालकाशी महिलेच्या मैत्रिणींनी संपर्क साधला. तेव्हा तिला शहरातल्या एका लॉजवर सोडल्याचं रिक्षाचालकानं सांगितलं. लॉजवर पोहोचल्यानंतर महिलेची खोली आतून बंद असल्याचं आढळून आलं. डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडल्यानंतर आत सदर नृत्यांगना महिलेचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
रोहित पवारांचे दोन ट्वीट, भाजपावर हल्लाबोल
दरम्यान, रोहित पवार यांनी या प्रकरणाबाबत भाष्य करणाऱ्या दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यात शुक्रवारी दुपारी केलल्या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. “जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलेलं नाही. अशातच जामखेडमध्ये लॉजमध्ये आत्महत्या झाल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी”, अशी मागणी रोहित पवार यांनी पोस्टमधून केली.
भाजपा उमेदवाराच्या पतीला अटक?
शुक्रवारी रात्री या प्रकरणात पोलिसांनी संदीप गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती रोहित पवार यांनी आपल्या सोशल पोस्टमध्ये दिली आहे. “अखेर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात संदीप गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तोच आरोपी आहे ज्याच्या पत्नीला भाजपाने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे. स्वतःचं लग्न झालं असतानाही एका नर्तिकेवर लग्न करण्यासाठी दबाव आणल्यामुळे तिच्यावर आत्महत्या करण्याची वेळ या आरोपीमुळे आली. या घटनेमुळे भाजपाचा खरा चेहरा पुढं आला आणि असे अनेक नमुने आहेत ज्यांना भाजपाने नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिली. हीच आहे पार्टी विथ डिफरन्स भाजपा”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
“आता कोणत्याही दबावाला बळी न पडता आत्महत्या केलेल्या महिलेला न्याय मिळवून द्यावा. एका महिलेला न्याय मिळावा म्हणून आमचंही या गुन्ह्याच्या तपासाकडे बारकाईने लक्ष राहील”, असंही रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत