Contact Banner

अयोध्या-प्रयागराज महामार्गावरील भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिलेचा मृत्यू, ११ जखमी – जिल्हा प्रशासन तात्काळ मदतीसह सक्रिय

ayodhya-prayagraj-mahamarg-apghat-pimprala-mrutyu-11-jakhmi



 अयोध्या-प्रयागराज महामार्गावरील भीषण अपघातात पिंप्राळा येथील महिलेचा मृत्यू, ११ जखमी – जिल्हा प्रशासन तात्काळ मदतीसह सक्रिय

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 6– उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या-प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजता जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा टूरिस्ट बस भीषण अपघातात सापडली. अयोध्या दर्शन करून परत येत असलेल्या बसला मागून येणाऱ्या वेगवान ट्रेलरने जबर धडक दिली. या दुर्घटनेत पिंप्राळा (ता. जळगाव) येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा मृत्यू झाला तर ११ भाविक जखमी झाले.

धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील ३० महिला व ५ पुरुष असे एकूण ३५ भाविकांचे पथक अयोध्या येथे दर्शनाकरिता गेले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये एकूण ४४ भाविक होते. जखमींना तातडीने सुलतानपूर येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. आवश्यक ते सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली.

अपघातानंतर जिल्हा प्रशासन तात्काळ सक्रिय झाले असून जखमी भाविकांच्या परतीसाठी रेल्वे तिकीटाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तसेच मृत महिलेचा मृतदेह नातेवाईकांसोबत घेऊन येण्यासाठी ॲम्बुलन्सची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही ॲम्बुलन्स दुपारीच जळगावकडे रवाना झाली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

याबाबत जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने माहिती घेत, जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकारी स्वतः या बचाव आणि मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

सुलतानपूर स्थानिक प्रशासन तसेच जळगाव जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात असून जखमींची सर्वतोपरी काळजी घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.