डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक – माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही समाजासाठी प्रेरक – माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील
लेवाजगत न्यूज फैजपूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून केली जाते. मात्र त्यांचे कार्य केवळ राज्यघटना निर्मितीपुरते मर्यादित नसून सामाजिक सुधारणा, न्याय, समता आणि बंधुत्व या तत्वांवर आधारित समाज उभारणीचे अद्वितीय योगदान त्यांनी दिले. बाबासाहेबांचे विचार आजही तितकेच प्रेरक आणि मार्गदर्शक असून समकालीन समाजाला दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे कार्यकारी मंडळ पदाधिकारी व माजी प्राचार्य डॉ. जी. पी. पाटील यांनी केले.
धनाजी नाना महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राध्यापक, प्राध्यापिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डी. बी. तायडे यांनी बाबासाहेबांचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्यांनी केलेल्या सुधारणा व कायदे आजही किती महत्वाचे आहेत, यावर प्रकाश टाकला. विविध विषयांचा सखोल अभ्यास, चिंतन आणि कठोर परिश्रमातून जगासाठी आदर्श ठरलेली भारतीय राज्यघटना तयार करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले. त्यामुळेच ‘ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून त्यांची ओळख आजही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित अभिवादन सभेतून बाबासाहेबांचे विचार घराघरात आणि मनामनात पोहोचविणे हेच खरी आदरांजली ठरेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्रा. डॉ. मनोहर सुरवाडे, प्रा. डॉ. हरीश नेमाडे, प्रा. डॉ. कल्पना पाटील, प्रा. डॉ. दीपक सूर्यवंशी यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत