भडगाव | शाळेच्या निष्काळजीपणाचा बळी : नाल्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
भडगाव | शाळेच्या निष्काळजीपणाचा बळी : नाल्यात पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्यूज | भडगाव :
भडगाव तालुक्यातील आदर्श कन्या शाळेच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नर्सरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या आवारात तोल जाऊन नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भडगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शाळेच्या संरक्षण भिंतीलगत कोणतीही सुरक्षा व्यवस्था, अडोका अथवा जाळी नसल्यामुळे दोन्ही बालके नाल्यात पडली. नाल्यात पाणी साचलेले असल्याने दोन्ही चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही वेळानंतर बालकांचे मृतदेह फुगलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का करण्यात आली नाही? शाळेच्या आवारात मूलभूत सुरक्षा उपाय का करण्यात आले नाहीत? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.
या घटनेनंतर संतप्त पालक व स्थानिक नागरिकांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. शाळेच्या निष्काळजीपणामुळे दोन निष्पाप जीव गमावल्याने संबंधित शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत