चळवळीतील कार्यकर्त्यांचे आधारवड होते डॅडी देशमुख – श्रीमंत माने विदर्भस्तरीय कार्यकर्ता पुरस्काराने प्रा. प्रवीण गुल्हाणे सन्मानित
चळवळीतील कार्यकर्त्यांचे आधारवड होते डॅडी देशमुख – श्रीमंत माने
विदर्भस्तरीय कार्यकर्ता पुरस्काराने प्रा. प्रवीण गुल्हाणे सन्मानित
अकोला | प्रतिनिधी —
डॅडी देशमुख हे अंधश्रद्धा निर्मूलनासह विविध सामाजिक व सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे खरे अर्थाने आधारवड होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमतचे संपादक श्रीमंत माने यांनी केले. ते श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथे आयोजित विवेकनामा फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. विचारपीठावर कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, विवेकनामा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश पाटील, उद्योजक प्रशांत देशमुख, प्राचार्य अंबादास कुलट तसेच विवेकनामा फाऊंडेशनचे संयोजक बबनराव कानकिरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेकनामा फाऊंडेशनच्यावतीने दिवंगत प्राचार्य डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा विदर्भस्तरीय कार्यकर्ता पुरस्कार यंदा अखिल भारतीय मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. प्रवीण गुल्हाणे यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते २१ हजार रुपये रोख, शाल व मानपत्र देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख, समाजसंत गाडगेबाबा आणि डॅडी देशमुख यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. विवेकनामा फाऊंडेशनचे संचालक नरेंद्र राणे (मुंबई), प्रदीप हिवाळे (बुलढाणा), डॉ. महेंद्र मेटे, प्रा. प्रशांत हरमकर व मायाताई वाकोडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष मधुभाऊ घारड, सदस्य प्रा. डॉ. कुमार बोबडे, डॉ. सुधीर बाजड, हर्षा ढोक, गायत्री आडे व प्रा. डॉ. राजेश मिरगे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या पुरस्काराचे पहिले मानकरी सर्पमित्र बाळ काळणे (अकोला) यांचाही गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषण
अध्यक्षीय भाषणात हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले की, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य मुळातच समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे होते. डॅडी देशमुख हे त्यांच्या विचारांचे सच्चे पाईक होते. त्यांनी संस्थेसाठी जीव ओतून काम केले. अनेक दिग्गज कलावंत, अभिनेते व सामाजिक कार्यकर्त्यांना संस्थेशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. विवेकनामा फाऊंडेशनने त्यांच्या नावाने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, संस्था सदैव या कार्यासोबत राहील, असेही त्यांनी नमूद केले.
दिलीपबाबू इंगोले
डॅडी देशमुख हे शिव परिवाराचा महत्त्वाचा घटक होते. तसेच ते विविध सामाजिक चळवळींत सक्रिय होते. आज समाज उलट्या दिशेने जात असून, विज्ञानापासून दूर जात आहे. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे अत्यंत गरजेचे आहे, असे दिलीपबाबू इंगोले यांनी सांगितले.
अविनाश पाटील
विवेकी परंपरा वृद्धिंगत करणे, संविधानिक तत्त्वांना केंद्रस्थानी ठेवून विशेषांक प्रकाशित करणे, संविधानिक मूल्यांचा आशय रुजवणे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जीवनाचा भाग बनवणे यासाठी विवेकनामा फाऊंडेशन विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती अविनाश पाटील यांनी दिली.
पुरस्कार स्वीकारताना प्रा. प्रवीण गुल्हाणे यांनी यापुढे ‘सायन्स ऑन व्हील’ हा उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बबनराव कानकिरड यांनी केले. मानपत्राचे वाचन विशाल विमल (पुणे) यांनी केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा दापूरकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन आम्ही भारतीय जनसंस्कृतिक चळवळीचे राज्य समन्वयक डॉ. प्रकाश मानेकर यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रसेवा दल, आम्ही भारतीय जनसांस्कृतिक चळवळ, अ. भा. अंनिस, संविधान संवाद समिती, जाणिव प्रतिष्ठान, टिचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट, महाराष्ट्र अंनिस, अ. भा. मराठी विज्ञान परिषद, प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती, बहुजन संघर्ष समिती, अ. भा. समाजवादी शिक्षण हक्क समिती, वुई फाऊंडेशन, शिक्षक भारती, नुटा, विज्युक्टा, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तसेच अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, मुर्तिजापूर व कारंजा येथील कार्यकर्ते व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत