जळगाव विमानतळावर बॉम्ब धमकी संदर्भात मॉक ड्रिल यशस्वी
जळगाव विमानतळावर बॉम्ब धमकी संदर्भात मॉक ड्रिल यशस्वी
लेवाजगत न्युज जळगाव:-
दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव विमानतळ येथे बॉम्ब धमकीच्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगाने मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पाडण्यात आली. या सरावाचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा प्रतिसाद, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेची सज्जता तपासणे हा होता.
मॉक ड्रिलदरम्यान संभाव्य धोका ओळखण्याची प्रक्रिया, विमानतळ परिसर सुरक्षित करण्याची कार्यवाही, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेस प्राधान्य, तसेच वेळबद्ध व नियमानुसार प्रतिसाद प्रणाली यावर विशेष भर देण्यात आला. यासोबतच विविध विभागांमध्ये प्रभावी संवाद व समन्वय कसा साधला जातो, याचीही प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.
या मॉक ड्रिलमध्ये पोलीस अधीक्षक जळगाव, अपर जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, बॉम्ब शोध व नाशक पथक (BDDS), मुख्य वैद्यकीय अधिकारी, MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत सर्व संबंधित यंत्रणांनी सहभाग घेतला.
सरावादरम्यान सर्व यंत्रणांमध्ये उत्कृष्ट समन्वय, तत्परता आणि कार्यक्षम प्रतिसाद दिसून आला. वास्तविक आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांची व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी अशा मॉक ड्रिल्स अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
प्रवाशांची सुरक्षितता, सज्ज प्रशासन आणि सक्षम प्रतिसाद प्रणाली यासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत