Contact Banner

जामनेरजवळ गारखेडा शिवारात रिक्षा–मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी

jamner-garkheda-rickshaw-mixer-truck-accident-three-killed-six-injured


जामनेरजवळ गारखेडा शिवारात रिक्षा–मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; तीन ठार, सहा जखमी

लेवाजगत न्यूज जामनेर | प्रतिनिधी
जामनेर–भुसावळ मार्गावर गारखेडा शिवारातील गंगापुरीजवळ काल संध्याकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास रिक्षा व मिक्सर ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

भुसावळहून जामनेरकडे येणारी पियाजो रिक्षा (क्रमांक MH 19 V 3704) व जामनेरकडून भुसावळकडे जाणारा मिक्सर ट्रक (क्रमांक MH 19 CX 2181) यांची जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. रिक्षामध्ये एकूण आठ प्रवासी प्रवास करत होते.

अपघातानंतर जखमींना तातडीने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र निकिता गोपाल निंबाळकर (वय २०, रा. चिंचखेडा बुद्रुक) व प्रमोद श्रीराम गुरुभैया (वय ३२, रा. तळेगाव) यांना डॉक्टरांनी तपासणीअंती मृत घोषित केले.

या अपघातात जयेश गोपाल निंबाळकर (वय १६), सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९), योगेश विठ्ठल गायकवाड (वय ४५, रा. चिंचखेडा), सुरेश विलास कापडे (वय ५०, रा. संभाजीनगर), अखिलेश कुमार (वय ५०, रा. उत्तर प्रदेश) व संगीता सुभाष चौधरी (वय ५०, रा. संभाजीनगर) हे गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले.

दरम्यान, जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना सरला गोपाळ निंबाळकर (वय ३९, रा. चिंचखेडा) यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातातील मृतांचा आकडा तीनवर पोहोचला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.