Contact Banner

महिलेच्या मेंदूतील फ्रॅक्चरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार मेंदू शल्यचिकीत्सकांच्या टीमच्या अथक प्रयत्नाला यश

mahilechya-mendutil-fracturevar-dr-ulhas-patil-rugnalayat-yashasvi-upchar-mendu-shalya-chikitsak-team-yash


महिलेच्या मेंदूतील फ्रॅक्चरवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

मेंदू शल्यचिकीत्सकांच्या टीमच्या अथक प्रयत्नाला यश 

लेवाजगत न्यूज जळगाव : गंभीर स्वरूपाच्या मेंदूतील दुखापतीवर उपचार करताना जास्तीत जास्त सतर्कता, वेळेवर योग्य निदान आणि अनुभवी डॉक्टरांची टीम हवी असते. अशाच प्रकारची गंभीर जखम झालेल्या ३२ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू शल्यचिकित्सकांनी धाडसी आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवण्यात मोठे यश मिळवले. उपचारांनंतर फिजिओथेरपीच्या मदतीने महिलेचा हात आणि पाय पुन्हा पूर्ववत चालू लागला आहेत.

याबाबत माहिती अशी की, तबस्सुम नामक ३२ वर्षीय महिलेच्या डोक्याला जबर मार बसल्याने मेंदूतील एकापाठोपाठ एक गुंतागुंतीचे परिणाम दिसू लागले. या घटनेनंतर तिला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या एका हाताचा व पायाचा ताबा पूर्णपणे सुटला होता, शरीराला संवेदना कमी झाल्या होत्या. तातडीने मेंदू शल्यचिकीत्सक डॉ. विपूल राठोड यांनी महिलेचा सीटी स्कॅन, एमआरआय तपासणी केली. या तपासणीत मेंदूत अति रक्तस्त्राव असल्याचे निदर्शनास आले. तसेच डोक्याचे हाड आतमध्ये खोलवर घुसून मेंदूवर दबाव निर्माण झाल्याचे आढळले. ही स्थिती अत्यंत जीवघेणी असून क्षणाक्षणाला धोका वाढत होता.परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन रुग्णालयातील मेंदू व मणक्याचे शल्यचिकित्सक डॉ. विपूल राठोड यांनी टीमला सक्रीय करीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.  मेंदू शल्यचिकित्सकांच्या पथकाने तपशीलवार मूल्यांकन करून ‘डिप्रेस स्कल फ्रॅक्चर विथ लार्ज फ्रन्टल हॅमरेज’ या अत्यंत गंभीर स्थितीसाठी तातडीची शस्त्रक्रिया अत्याधुनिक उपकरणांसह उच्च कौशल्यासहीत यशस्वीरित्या  शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रिये दरम्यान डॉक्टरांनी मेंदूत झालेला रक्तस्त्राव नियंत्रित केला, आतमध्ये घुसलेले हाड काळजीपूर्वक बाहेर काढले आणि मेंदूवरील दबाव कमी करून रक्ताभिसरण पुन्हा सामान्य केले. शस्त्रक्रिया अत्यंत यशस्वी झाली आणि रुग्णाला आयसीयूमध्ये पुढील उपचारासाठी ठेवण्यात आले. काही तासांतच तिची शुद्ध सुधारू लागली, तर पुढील काही दिवसांनी हात-पायांमध्ये हळूहळू हालचाल दिसू लागली.

फिजीओथेरेपी ठरली महत्वाची

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दीर्घकालीन फिजिओथेरपी देण्यात आली. नियमित उपचार, तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केलेले व्यायाम आणि काउंसिलिंग यांच्या मदतीने महिलेच्या हात-पायांचा ताबा पुन्हा वाढू लागला. आज ती पूर्वीप्रमाणे दैनंदिन कामकाज करण्यास सक्षम झाली असून, हे या उपचारपद्धतीचे मोठे यश मानले जात आहे.


रुग्णाच्या मेंदूत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होता आणि हाड आतमध्ये घुसल्याने मेंदूवर गंभीर दाब निर्माण झाला होता. वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला गंभीर धोका संभवला असता. आमच्या संपूर्ण टीमच्या समन्वयित प्रयत्नांमुळेच शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. फिजिओथेरपीनंतर रुग्णाची प्रकृती आता लक्षणीय सुधारली आहे, ही आमच्यासाठीही आनंदाची बाब आहे.

- डॉ. प्रितम दास, निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.