सप्तश्रृंग गडावरील दरीत मोटार कोसळून सहा जणांचा मृत्यू
सप्तश्रृंग गडावरील दरीत मोटार कोसळून सहा जणांचा मृत्यू
लेवाजगत न्यूज नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावरील घाटात भीषण अपघात झाला. संरक्षक काठडा तोडून एक मोटार सुमारे हजार फूट खोल दरीत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये चार महिला असून सर्वजण निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी आहेत.
पिंपळगाव बसवंत येथील पटेल कुटुंबीय सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी रविवारी सात जण मोटारीने गेले होते. दर्शनानंतर परत येत असताना गडावरील घाटातील गणपती पॉइंटजवळ चालकाचे मोटारवरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्यालगत असलेल्या संरक्षक भिंतीवर आपटून ती तोडत खोल दरीत कोसळली. चेंडूप्रमाणे गाडी लोळत खाली गेल्याने तिचा चक्काचूर झाला.
या भीषण अपघातात कीर्ती पटेल (५०), रसीला पटेल (५०), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०), पचन पटेल (६०) आणि मणिबेन पटेल (६०) यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत वणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद सुरू होती.
या दुर्घटनेबाबत माहिती देताना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी सांगितले की, अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे काम सुरू असून सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
दरम्यान, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी नरेश अकुनुरी, तहसीलदार रोहिदास वारुळे, तसेच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जिल्हाधिकारी . प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे हे मदत पथकाशी सातत्याने संपर्कात आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत