उच्च न्यायालयाच्या मतमोजणी निकालाला ‘सर्वोच्च’ आव्हान; ५ डिसेंबरला सुनावणी
उच्च न्यायालयाच्या मतमोजणी निकालाला ‘सर्वोच्च’ आव्हान; ५ डिसेंबरला सुनावणी
लेवाजगत न्यूज अकोला : राज्यातील नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरू असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर गेली असून, त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर ही याचिका उद्या, ५ डिसेंबर रोजी सुनावणीस येणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे.
राज्यातील सर्व २८८ नगरपालिका व नगरपंचायतींची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २ डिसेंबरला दिला होता. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही मतदान झाल्यानंतर पुढील अर्ध्या तासापर्यंत जाहीर करता येणार नाहीत, असेही आदेशात नमूद केले आहे. २ डिसेंबरला राज्यातील २६४ नगरपालिका व नगरपंचायतींसाठी मतदान झाले होते आणि मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती. मात्र सुधारित कार्यक्रमानुसार २४ नगरपालिका व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी तसेच ७६ नगरपालिका व नगरपंचायतींमधील १५४ सदस्यपदांसाठी २० डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे सर्व मतमोजणी निकाल एकाच दिवशी — २१ डिसेंबरला — घोषित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
निवडणूक प्रक्रियेवर न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्याने काही निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानापूर्वी काही निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यास परिणामांवर प्रभाव पडू शकतो, अशा आशयाची याचिका दाखल करण्यात आली होती. यावर विचार करून न्यायालयाने एकाच दिवशी मतमोजणी करण्याचे निर्देश दिले. मात्र, या आदेशाविरोधात याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून ४ डिसेंबरला ती स्वीकारण्यात आली आहे.
ही याचिका राजकिरण बर्वे आणि कारंजा येथील ‘एआयएमआयएम’चे प्रदेश उपाध्यक्ष मो. युसूफ पुंजानी यांनी संयुक्तरित्या दाखल केली आहे. तत्काळ मतमोजणी करण्याची मागणी यामध्ये करण्यात आली असून उद्या यावर सुनावणी नियोजित असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. फिरोज शेकूवाले यांनी दिली. या सुनावणीतील निर्णयावर राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मतमोजणीचे भवितव्य ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत