अमेरिकेने उडवली सेन्सेक्सची दाणादाण… १४०० अंशांच्या घसरणीचे पडसाद किती दिवस राहणार?
अमेरिकेने उडवली सेन्सेक्सची दाणादाण… १४०० अंशांच्या घसरणीचे पडसाद किती दिवस राहणार?
देश विदेश वृत्त -देशांतर्गत भांडवली बाजारात मोठी अस्थिरता पाहायला मिळत असून अवघ्या दोन सत्रांमध्ये प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स १,४०० अंशांहून अधिक कोसळला आहे. ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिकेने जागतिक पातळीवर छेडलेल्या संभाव्य व्यापारयुद्धाची भीती, जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि तिसऱ्या तिमाहीतील संमिश्र आर्थिक निकाल यांचा एकत्रित परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव कायम आहे.
बाजारात किती घसरण झाली?
आठवड्याची सुरुवातच बाजारासाठी धक्कादायक ठरली. मंदीवाल्यांच्या दबावामुळे सलग दोन सत्रांत सेन्सेक्स सुमारे १,४०० अंशांनी घसरून पुन्हा ८२ हजारांच्या आसपास स्थिरावला. दुसरीकडे निफ्टी ५० ने २५,२०० अंशांची महत्त्वाची पातळी गमावली असून इंट्राडे व्यवहारात तो २५,१७१.३५ पर्यंत खाली आला.
बाजारातील भीतीचे मापक मानला जाणारा इंडिया व्हीआयएक्स जवळपास ८ टक्क्यांनी वाढला असून, नजीकच्या काळात बाजारात मोठी अस्थिरता राहण्याचे संकेत यातून मिळत आहेत.
क्षेत्रीय पातळीवर गृहनिर्माण, ग्राहकोपयोगी वस्तू, माहिती तंत्रज्ञान, धातू आणि औषधनिर्माण क्षेत्रातील निर्देशांक प्रत्येकी सुमारे २ टक्क्यांनी घसरले. दोन सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे अंदाजे १२ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल जवळपास ४६८ लाख कोटी रुपयांवरून ४५६ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरले आहे.
व्यापारयुद्धाची भीती कितपत गंभीर?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी ग्रीनलँड खरेदीबाबत आक्रमक भूमिका घेतल्याचे संकेत दिल्यानंतर जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढला आहे. या निर्णयाला विरोध करणाऱ्या युरोपीय देशांवर शुल्क लावण्याची धमकी दिल्याने गुंतवणूकदार अधिकच अस्वस्थ झाले आहेत.
च्या अहवालानुसार, जर अमेरिकेने युरोपीय देशांवर १० टक्के शुल्क लागू केले, तर युरोपियन युनियन अमेरिकेच्या १०८ अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तूंवर प्रतिशुल्क लावण्याचा विचार करू शकते.
ग्रीनलँडवरून अमेरिका-युरोप संघर्षाबाबत स्पष्टता येईपर्यंत बाजारातील अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. दोन्ही बाजूंनी भूमिका कठोर केल्यास ही अनिश्चितता आणखी काही काळ टिकू शकते, असे चे मुख्य गुंतवणूक रणनीतिकार व्ही.के. विजयकुमार यांनी स्पष्ट केले आहे.
सोने-चांदीकडे गुंतवणुकीचा कल
वाढलेल्या भू-राजकीय आणि भू-आर्थिक जोखमींमुळे गुंतवणूकदार समभागांमधील गुंतवणूक कमी करून सुरक्षित मालमत्तांकडे वळत आहेत. सोन्या-चांदीतील विक्रमी तेजीमुळे नफावसुली करून मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे औद्योगिक मागणी असलेल्या चांदीने सोन्यालाही मागे टाकत वायदे बाजारात ३.३५ लाख रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे.
तिसऱ्या तिमाहीचे संमिश्र निकाल
नवीन कामगार कायद्यांच्या एक-वेळच्या परिणामामुळे तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक निकाल संमिश्र स्वरूपाचे राहिले आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यावर याचा मोठा परिणाम झाला असून त्यामुळे आधीच दबावाखाली असलेला बाजार सावरू शकलेला नाही. मात्र वाहन उद्योगातील कंपन्यांचे निकाल अपेक्षेप्रमाणे चांगले राहण्याची शक्यता असल्याने पुढील काळात काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
परदेशी गुंतवणूकदारांची सतत विक्री
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून (FII) सातत्याने विक्री सुरू आहे. भारत-अमेरिका व्यापार कराराविषयीची अनिश्चितता, रुपयाची घसरण आणि मूल्यांकनाबाबतची चिंता यामुळे जानेवारी महिन्यात आतापर्यंत २९,००० कोटी रुपयांहून अधिक समभाग विक्री झाली आहे. सलग दहा सत्रांत निधीचे निर्गमन झाल्याने बाजारावरील दबाव अधिक वाढला आहे.
अर्थसंकल्पापूर्वी सावधगिरी
१ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. आर्थिक वाढ, रोजगारनिर्मिती आणि ग्राहक मागणी वाढवण्यासाठी सरकारकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा आहे. मात्र वित्तीय तूट आणि भांडवली खर्च यामध्ये संतुलन राखण्याचे आव्हान असल्याने बाजारात अनिश्चितता कायम आहे.
डॉलरसमोर रुपयाची घसरण
डॉलरची वाढती मागणी आणि परदेशी निधीचे निर्गमन यामुळे रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर घसरला आहे. २० जानेवारी रोजी रुपया प्रति डॉलर ९०.९७ वर बंद झाला. वाढलेली भू-राजकीय अनिश्चितता आणि जोखीम टाळण्याची प्रवृत्ती यामुळे उदयोन्मुख बाजारातील चलनांवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत