अष्टविनायक श्री लेण्याद्री देवस्थान : श्रद्धा, इतिहास व निसर्गसौंदर्याचे अद्वितीय संगमस्थळ
अष्टविनायक श्री लेण्याद्री देवस्थान : श्रद्धा, इतिहास व निसर्गसौंदर्याचे अद्वितीय संगमस्थळ
लेवाजगत / प्रतिनिधी-संकलन : सुनील ठाकूर, पत्रकार
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेले श्री क्षेत्र लेण्याद्री हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे व स्वयंभू देवस्थान आहे. येथे विराजमान असलेल्या गणपतीस ‘श्री गिरीजात्मज’ या नावाने ओळखले जाते. पुणे शहरापासून सुमारे ९८ किलोमीटर तर जुन्नर शहरापासून उत्तरेस अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे.
देवाची पौराणिक आख्यायिका
पुराणकथेनुसार हिमकन्या पार्वतीला श्री विनायकाने आपल्या पोटी जन्म घ्यावा अशी तीव्र इच्छा होती. त्यासाठी माता पार्वतीने लेण्याद्रीच्या गुहेत तब्बल बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली. या काळात तिने मातीची मूर्ती तयार करून श्री विनायकाची अखंड पूजा व सेवा केली. तिच्या तपाने प्रसन्न होऊन श्री गणेश भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी बटुस्वरूपात माता पार्वतीसमोर प्रकट झाले आणि याच लेण्याद्री पर्वतावर वास्तव्यास राहिले.
श्री गणेशाच्या सर्व बाललीला लेण्याद्री डोंगर परिसरातच घडल्या. गौतम ऋषींनी येथेच श्री गिरीजात्मजाचे सातव्या वर्षी मौंजीबंधन केले. बालगणेशाने बालासुर, व्योमासुर, शतमहिषा, कमलासुर, मंजकासुर अशा अनेक दुष्टांचा संहार करून सज्जनांचे रक्षण केले. तसेच शेष, इंद्र, यम यांचा गर्वहरण करून अवतारकार्य पूर्ण झाल्यावर श्री गिरीजात्मज याच क्षेत्रात गुप्त झाले.
मंदिर व लेण्यांची वैशिष्ट्ये
लेण्याद्री हे नाव सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कोरलेल्या लेण्यांमुळे पडले आहे. येथे पूर्व ते पश्चिम दिशेने एकूण २८ बौद्ध लेण्या असून त्यातील सातव्या क्रमांकाच्या कोरीव लेणीत श्री गिरीजात्मज गणपतीचे मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे साडेतीनशे पायऱ्या आहेत. मुख्य गाभाऱ्यासमोरील सभामंडप प्रशस्त असून विशेष म्हणजे येथे कोणताही खांब नाही. सभामंडपाबाहेर दोन पाण्याची टाकी असून त्यात वर्षभर थंड पाणी असते; मात्र सध्या सुरक्षिततेच्या कारणास्तव त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.
भाविकांची श्रद्धा आणि देवस्थानची सेवा
अष्टविनायकांपैकी डोंगरावर असलेले व बौद्ध लेण्यांच्या सान्निध्यातील एकमेव क्षेत्र म्हणजे श्री लेण्याद्री. ‘श्री गिरीजात्मजाच्या’ दर्शनाने कुटुंब, व्यवसाय व आयुष्यातील अडचणी दूर होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. देश-विदेशातून हजारो भाविक दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. तसेच निसर्गसौंदर्य, लेणी व कोरीवकाम अभ्यासण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांची मोठी गर्दी असते.
भाविक व पर्यटकांना सुविधा देण्यासाठी १९५५ साली गोळेगाव येथील ग्रामस्थांनी श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्टच्या माध्यमातून अल्पदरात निवास व्यवस्था, महाप्रसाद, शुद्ध पिण्याचे पाणी, पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा अशा विविध सेवा पुरविल्या जातात. याशिवाय सामाजिक व धार्मिक उपक्रमही राबविले जातात.
वर्षभर साजरे होणारे उत्सव
देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरमहा विनायकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी व अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भाद्रपद महिन्यात भव्य श्री गणेश चतुर्थी उत्सव, माघ महिन्यात श्री गणेश जयंती तसेच अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने पार पडतो.
देवस्थान ट्रस्ट – विश्वस्त मंडळ
ॲड. संजय रामदास ढेकणे (अध्यक्ष), गोविंद यशवंत मेहेर (उपाध्यक्ष), शंकर लक्ष्मण ताम्हाणे (सेक्रेटरी), भगवान नाना हांडे (खजिनदार) यांच्यासह प्रभाकर रामचंद्र जाधव, मच्छिंद्र बाबुराव शेटे, सुरेश मल्हारी वाणी, प्रभाकर पिलाजी गडदे, सदाशिव शंकर ताम्हाणे, काशिनाथ दत्तात्रय लोखंडे, विजय रामचंद्र वर्हाडी, नंदकुमार जगन्नाथ बिडवई, जयवंत ज्ञानेश्वर डोके, कैलास लक्ष्मण लोखंडे व जितेंद्र चंद्रकांत बिडवई हे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
श्रद्धा, इतिहास, पुराणकथा आणि निसर्गसौंदर्य यांचा अद्वितीय संगम असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे एक महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत