Contact Banner

अष्टविनायक : श्री क्षेत्र ओझर देवस्थान – श्रद्धा, इतिहास व सेवाभावाचा संगम

 

ashtavinayak-shri-kshetra-ozhar-devsthan-shraddha-itihas-va-sevabhavacha-sangam


अष्टविनायक : श्री क्षेत्र ओझर देवस्थान – श्रद्धा, इतिहास व सेवाभावाचा संगम

संकलन : सुनील ठाकूर, पत्रकार लेवाजगत

नमो जी आद्या! वेदप्रतिपाद्या!

जय जय स्वयंवेद्या! आत्मरूपा!!

सर्व जगताचे आद्यकारण, सर्व वेदांचा कर्ता, निर्गुण-निर्विकार, स्वयंप्रकाशी व सकल बुद्धीला प्रकाश देणारा मंगलमूर्ती मोरया हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ श्री गणेशाच्या स्मरणानेच होतो. विघ्नांचा नाश करणारा, संकटसमयी भक्तांचे रक्षण करणारा हा गणनायक प्रत्येकाच्या हृदयगाभाऱ्यात विराजमान आहे.

गौरवशाली तीर्थक्षेत्र ओझर

अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री क्षेत्र ओझर हे ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेले अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या क्षेत्राला लाभलेला परिसरही तितकाच वैभवशाली आहे. पश्चिमेस लेण्याद्री, उत्तरेस शिवनेरी किल्ला, पूर्वेस आळेगाव, तसेच कुकडी नदीवरील येडगाव धरण असा समृद्ध परिसर ओझरला लाभलेला आहे. या सर्वांच्या मध्यभागी श्री गणेशाच्या मुकुटातील पुष्पमकरंदाप्रमाणे श्री विघ्नहर भक्तिभावाने शोभून दिसतात. कुकडी माईच्या जलाशयासोबत देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गणेशभक्तांच्या श्रद्धेचा सुगंध दाही दिशांना दरवळतो.

मंदिराची रचना व वैशिष्ट्ये

श्री विघ्नहर गणपती मंदिर हे मंदिर पेशवेकालीन असून वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना मानले जाते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार मुनिपुत्र कोरलेले आहेत. त्यापैकी पहिला व चौथा मुनिपुत्र शिवलिंग धारण केलेले असून दुसरा व तिसरा मुनिपुत्र वीणा धारण केलेले आहेत. यामधून गणराज आपल्या आई-वडिलांना श्रेष्ठत्व देतात व आई-वडिलांची सेवा हाच खरा गणेशभक्तीचा मार्ग आहे, असा बोध दिला जातो.

प्रवेशद्वारावर राक्षसाकृती, शेषनाग व वास्तुपुरुषाची कोरीव शिल्पे असून कमानीत जास्वंदीच्या वेलीचे कोरीव काम आहे. जास्वंद हे क्रांतीचे प्रतीक मानले जाते. आत प्रवेश करताना चार उतरत्या पायऱ्या आहेत, ज्यातून राग, लोभ, मद व मत्सर हे चार अवगुण सोडून मंदिरात प्रवेश करावा, असा संदेश दिला जातो.

मंदिर पूर्वाभिमुख व बंदिस्त असून चारही बाजूंनी भक्कम दगडी तटबंदी आहे. महाद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन उंच दगडी दीपमाळा आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला येथे दीपोत्सव साजरा केला जातो. सभामंडपात प्रवेश करताच शमगुणी, मनोनिग्रह शिकवणाऱ्या कासवाचे दर्शन होते. प्रदक्षिणा मार्गावर भैरवनाथाचे दर्शन असून विघ्नरहित दर्शनासाठी ते सदैव जागृत असल्याची भक्तांची श्रद्धा आहे.

गाभाऱ्यात श्री विघ्नहराची पूर्णाकृती, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख बैठी मूर्ती विराजमान आहे. मूर्तीवर शेंदूरलेपन, डोळ्यांत माणके, कपाळावर व नाभीत हिरा, तसेच सोन्याचा मुकुट अशी भव्य सजावट आहे. बाजूस रिद्धी-सिद्धीच्या पितळी मूर्ती असून गाभाऱ्यात पंचायतन मूर्तींचे कोनाडे आहेत.

पौराणिक कथा

पुरातन काळी हेमवती नगरीत अभिनंदन नावाचा राजा होता. सत्ता व संपत्तीच्या लोभातून त्याने इंद्रपद मिळवण्यासाठी यज्ञ सुरू केला; मात्र इंद्राचा सन्मान टाळला. या अन्यायामुळे इंद्राने काळाचे आवाहन केले आणि विघ्नासुर पृथ्वीवर अवतरला. त्याने सर्व वैदिक कर्मकांडात विघ्ने निर्माण केली. भयभीत देवांनी श्री गणेश यांना शरण गेले.

गजाननांनी पार्श्वपुत्राचे रूप धारण करून विघ्नासुराशी तुंबळ युद्ध केले. अखेरीस विघ्नासुर शरण आला. गजाननांनी त्याला अभयदान देत अट घातली की जिथे माझी भक्ती होईल तिथे तू राहू शकणार नाहीस. विघ्नासुराच्या विनंतीवरून गजानन विघ्नेश्वर व विघ्नहर म्हणून ओळखले जाऊ लागले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला नैऋत्य दिशेला विघ्नेश्वराची स्थापना झाली—ही घटना ओझर येथेच घडली, अशी पौराणिक मान्यता आहे.

दैनंदिन कार्यक्रम

मंदिर उघडणे : पहाटे ५.००

अग्रपूजा व अभिषेक : ५.१५ ते ७.००

महाआरती : सकाळी ७.००

पोथीवाचन : ७.३० ते ८.००

मध्यान्ह आरती : दुपारी १२.००

हरिपाठ : सायं. ७.०० ते ८.००

शेजारती : रात्रौ १०.३०

मंदिर बंद : रात्रौ ११.००

महाप्रसाद : सकाळी १०.०० ते १.०० व सायं. ७.३० ते १०.३०

दरमहा सुमारे ६० हजार भाविक दर्शन घेतात. संकष्टीला सुमारे ५० हजार तर अंगारकी संकष्टीला सुमारे ३ लाख भाविकांची उपस्थिती असते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा उत्सव, माघ शुद्ध चतुर्थी (गणेश जयंती) व अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात.

देवस्थान ट्रस्ट व अन्नदान योजना

मंदिराची व्यवस्था श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चोखपणे पाहतो. भाविकांच्या सोयीसाठी चार भक्तनिवास, स्वच्छतागृहे, भव्य प्रवेशद्वार, ३० हजार चौ.फुटांचे सांस्कृतिक भवन-मंगल कार्यालय व अद्यावत भोजनगृह उभारण्यात आले आहे.

महाप्रसादासाठी अल्प सेवा शुल्कात सकस भोजन दिले जाते. दररोज दीड ते दोन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. २१ ऑगस्ट २००४ रोजी सुरू झालेली “अन्नदान महाप्रसाद योजना” विशेष लोकप्रिय आहे. २१,००० रुपयांची देणगी देऊन दहा वर्षे भाविकांना महाप्रसाद अर्पण करण्याची संधी या योजनेतून मिळते. जन्मदिन, लग्नवाढदिवस, संकष्टी, विनायकी, अंगारकी चतुर्थी तसेच स्मृतिदिनानिमित्त भाविकांच्या वतीने महाप्रसाद अर्पण केला जातो.

“अन्ने श्रीतानि भूतानि, अन्नप्राण इति श्रुती”

या श्रुतीवचनाप्रमाणे तीर्थक्षेत्री आलेला देवभक्त हाच खरा सत्पात्र मानून ओझर येथील श्री विघ्नहराच्या चरणी अन्नदान केल्यास पुण्यलाभ निश्चित होतो, असा भाविकांचा दृढ विश्वास आहे.

श्रद्धा, इतिहास, पुराणकथा व सेवाभाव यांचा अद्वितीय संगम असलेले श्री क्षेत्र ओझर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.