बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत मोठा निर्णय ‘या’ चार बाबींची चौकशी होणार; निवडणूक आयुक्तांची माहिती
बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत मोठा निर्णय
‘या’ चार बाबींची चौकशी होणार; निवडणूक आयुक्तांची माहिती
लेवाजगत न्यूज | मुंबई –
महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात असून १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. प्रचाराची सांगता आज (१३ जानेवारी) झाली आहे. दरम्यान, राज्यभरात ६० हून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने विरोधकांनी यावर तीव्र टीका करत चौकशीची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर यांनी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयोगाने संबंधित महापालिका आयुक्तांकडून सविस्तर अहवाल मागवले असून त्यानंतर चार प्रमुख मुद्द्यांवर तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
निवडणूक आयुक्तांनी काय सांगितले?
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना निवडणूक आयुक्त म्हणाले,
“ज्या ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे, तेथील संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होती की नाही, याची तपासणी केली जाईल. त्यासाठी संबंधित महापालिका आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.”
कोणत्या चार गोष्टी तपासल्या जाणार?
राज्य निवडणूक आयोगाकडून पुढील चार बाबींची चौकशी केली जाणार आहे –
- बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराकडून इतर उमेदवारांवर कोणताही दबाव आणला गेला होता का?
- माघार घेतलेल्या उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा अन्य प्रकारचा प्रभाव टाकण्यात आला होता का?
- अशा प्रकाराबाबत कोणतीही पोलिस तक्रार दाखल झाली आहे का किंवा अन्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत का?
- माघार घेतलेल्या उमेदवारांनी स्वेच्छेने उमेदवारी मागे घेतली होती का?
या सर्व मुद्द्यांचा सखोल अभ्यास अहवालाच्या आधारे करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
१२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर
दरम्यान, आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केली.
ज्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत –
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम
- अधिसूचना (नोटिफिकेशन) : १६ जानेवारी
- उमेदवारी अर्ज : १६ ते २१ जानेवारी २०२६
- अर्ज छाननी : २२ जानेवारी २०२६
- अर्ज माघार : २७ जानेवारी, दुपारी ३ वाजेपर्यंत
- अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
- मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
- मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत