राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीररा -ज्य निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा
राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जाहीररा -ज्य निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा
लेवाजगत न्यूज | मुंबई –
राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून १५ जानेवारी रोजी मतदान, तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. प्रचाराचा आज (१३ जानेवारी) शेवटचा दिवस असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर आज राज्य निवडणूक आयोग यांची पत्रकार परिषद पार पडली.
या पत्रकार परिषदेत राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची अधिकृत घोषणा केली.
निवडणूक आयुक्तांनी काय सांगितले?
निवडणूक आयुक्तांनी सांगितले की,
“जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांबाबत माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण आहे, त्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आदेशांच्या अनुषंगाने राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये निवडणुका घेतल्या जाणार आहेत.”
कोणत्या जिल्हा परिषदांची निवडणूक होणार?
कोकण विभाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
पुणे विभाग : पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर
‘मतदाराला दोन मते देणे बंधनकारक’
निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले की,
“जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मते देणे बंधनकारक असेल. एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे मत पंचायत समिती गणासाठी द्यावे लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे.”
जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना (नोटिफिकेशन) : १६ जानेवारी
उमेदवारी अर्ज : १६ ते २१ जानेवारी २०२६
अर्ज छाननी : २२ जानेवारी २०२६
अर्ज माघार : २७ जानेवारी, दुपारी ३ वाजेपर्यंत
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी, दुपारी ३.३० नंतर
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६, सकाळी १० वाजता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत