Contact Banner

मोठी बातमी! चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; अवघे १० किमी उड्डाण केल्यानंतर कोसळलं, ६ जण जखमी




मोठी बातमी! चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात; अवघे १० किमी उड्डाण केल्यानंतर कोसळलं, ६ जण जखमी

लेवाजगत न्यूज | भुवनेश्वर :
ओडिशातील राउरकेलाहून भुवनेश्वरकडे निघालेल्या ९ सीटर चार्टर्ड विमानाचा शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आणि सुमारे १० किलोमीटर अंतर कापल्यानंतर हे विमान जालदा परिसरात कोसळले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून विमानातील सर्व सहा जण जखमी झाले आहेत.

हे विमान इंडिया वन एअर या खासगी कंपनीचे होते. विमानात चार प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. पायलट म्हणून कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव हे दोघे कार्यरत होते. अपघातानंतर सहाही जणांना तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि स्थानिक प्रशासनानेही बचाव कार्यात सक्रिय सहभाग घेतला. पायलट्सनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला होता, मात्र विमान वेगाने खाली येत असल्याने तो प्रयत्न अयशस्वी ठरला.

विमान कोसळताच परिसरात एकच खळबळ उडाली. आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने मदत व बचाव कार्य सुरू केले. दुपारी सव्वाच्या सुमारास हे विमान भुवनेश्वरमध्ये उतरणे अपेक्षित होते, मात्र त्याआधीच हा अपघात घडला.

दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड की अन्य कारण याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अपघाताची कारणे स्पष्ट होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे अंतर्गत विमानसेवेच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.