चिंचपाडा येथे लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याणचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न
चिंचपाडा येथे लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याणचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न
चिंचपाडा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी चिंचपाडा येथे लेवा पाटीदार समाज मंडळ, कल्याण यांचे वार्षिक स्नेहसंमेलन सुमारे बाराशे समाज बांधव, माता-भगिनींच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव प्रा. राजेश भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहसचिव श्री. दीपक नेमाडे व सौ. प्रतिभा भारंबे मॅडम यांनी प्रभावीपणे केले.
या प्रसंगी व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. हेमंतभाऊ चौधरी, कार्याध्यक्ष मा. युवराज चौधरी, इंडाला ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय महाजन, प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप सरोदे तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्री. निलेश बढे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात समाजातील बालगोपाळांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाज बांधवांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष मा. हेमंतभाऊ चौधरी यांनी अधिकाधिक समाज बांधवांनी मंडळाशी संलग्न होऊन विविध उपक्रमांना सहकार्य करावे, तसेच सकारात्मक प्रयत्नांद्वारे कल्याण परिसरात मंडळाची भव्य वास्तू उभारणे शक्य असल्याचे मत व्यक्त केले.
कार्याध्यक्ष मा. युवराज चौधरी यांनी मंडळाच्या माध्यमातून शैक्षणिक, शालेय व सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप सरोदे यांनी विद्यार्थ्यांनी व तरुणांनी शिक्षण व व्यवसायातील संधी वेळेत ओळखून उज्ज्वल करिअर घडवावे, असे मोलाचे मार्गदर्शन केले.
तर डॉ. विजय महाजन यांनी इंडाला ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन सुरूच ठेवण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व समाज बांधवांनी खास लेवा पाटीदार शैलीतील भरीत पुरी, कढी, वरण-भात अशा रुचकर स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत