भाजपवर पाईप चोरांचा प्रचार करण्याची वाईट वेळ…” एकनाथ खडसेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
भाजपवर पाईप चोरांचा प्रचार करण्याची वाईट वेळ…”
एकनाथ खडसेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
लेवाजगत न्यूज जळगाव :
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आले आहे. यांनी भाजपचे आमदार यांच्यावर जोरदार टीका करत भाजपची अंतर्गत विसंगती उघड केली आहे.
पाईप चोरीप्रकरणी ज्या पदाधिकाऱ्यांविरोधात आमदार भोळे यांनी यापूर्वी आक्रमक भूमिका घेतली होती, आंदोलन केले होते आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती, त्याच उमेदवारांच्या समर्थनार्थ आज महापालिका निवडणुकीत प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा घणाघाती टोला खडसे यांनी लगावला.
“ज्यांना ‘पाईप चोर’ म्हटले, त्यांच्यासाठी आज प्रचार करावा लागतोय. तुमची कीव वाटते,” असे म्हणत खडसे यांनी आमदार भोळे यांना डिवचले.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर खडसे यांनी पहिल्याच सभेत भाजपवर निशाणा साधला. जळगाव येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी भाजपच्या भूमिकांतील बदलांवर बोट ठेवले. राजकारणात भूमिका बदलू शकतात; मात्र जनतेसमोर घेतलेल्या भूमिकांची जबाबदारीही घ्यावी लागते, असे सूचक विधान त्यांनी केले.
भाजपने आयारामांना दिलेल्या महत्त्वावरही खडसे यांनी कडाडून टीका केली. आतापर्यंत भाजपविरोधात असलेले, ज्यांच्याविरोधात आंदोलने आणि आरोप करण्यात आले, तेच माजी नगरसेवक आज भाजपमध्ये दाखल झाले असून त्यांनाच उमेदवारी दिली गेल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. याउलट भाजपसाठी निष्ठेने काम करणारे जुने कार्यकर्ते व अनुभवी नेते बाजूला पडल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
“जुन्या, निष्ठावंत नेत्यांवर आज अशा लोकांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैव आहे,” असे सांगत भाजपमध्ये निष्ठेपेक्षा संधीसाधूपणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
महायुतीचे १२ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याच्या मुद्द्यावर बोलताना खडसे यांनी गंभीर आरोप केले. दबाव, पैशाचा वापर, धमकी आणि भीतीचे वातावरण निर्माण करून बिनविरोध निवडी केल्या गेल्या असल्याचा दावा त्यांनी केला. “लोकशाहीत मतदार राजा असतो; मात्र आज त्यालाच कमी लेखण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे ते म्हणाले.
पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या मस्तीत निवडणूक जिंकता येईल, असा गैरसमज महायुतीला झाला आहे. मात्र परिवर्तन घडवण्याची खरी ताकद अजूनही जनतेकडेच आहे, असे ठामपणे सांगत खडसे यांनी मतदारांना आवाहन केले.
खडसे यांच्या या वक्तव्यांमुळे जळगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात प्रचार आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून या टीकेला प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यताही व्यक्त केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत