Contact Banner

हतनूर जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पक्षी गणना


हतनूर जलाशयावर आशियाई पाणपक्षी गणना
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पक्षी गणना

चातक निसर्ग संवर्धन संस्थेचा उपक्रम; पक्षीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन

लेवाजगत न्युज वरणगाव (भुसावळ तालुका):
निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व असलेल्या हतनूर धरण जलाशयावर रविवार, दि. २५ रोजी आशियाई पाणपक्षी गणना होणार आहे. ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी पक्षी गणना असून, सदर उपक्रम चातक निसर्ग संवर्धन संस्था, वरणगाववनविभाग जळगाव – मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या भव्य उपक्रमात परिसरातील निसर्गप्रेमी, पक्षीप्रेमी व छायाचित्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरवर्षीप्रमाणे हतनूर धरण जलाशय हे देश-विदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पाणपक्ष्यांचे तसेच स्थानिक पक्ष्यांचे महत्त्वाचे आश्रयस्थान मानले जाते. हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण पाणपक्षी जानेवारी महिन्यात हतनूर जलाशयावर दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची संख्या, प्रजाती, त्यांचे वर्तन तसेच अधिवास याबाबत शास्त्रीय माहिती संकलित करण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या उपक्रमामुळे जैवविविधतेचे संवर्धन, पर्यावरणीय जागरूकता तसेच भविष्यातील संशोधनाला चालना मिळणार असून, या परिसराला रामसर स्थळाचा दर्जा मिळवण्यासाठीही मदत होणार आहे. पक्षीनिरीक्षणाची आवड असलेल्या नागरिकांसाठी ही एक दुर्मिळ संधी असून, निसर्गाशी नाते दृढ करण्यासाठी हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.