Contact Banner

मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

 





मेंदूज्वर आजाराच्या चिमुकलीवर यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञांच्या प्रयत्नांना यश

लेवाजगत न्यूज जळगाव :
मुक्ताईनगर तालुक्यातील दीड वर्षीय चिमुकलीवर मेंदूज्वर या गंभीर व जीवघेण्या आजारावर जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करून तिचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे. वेळेवर मिळालेल्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवेमुळे चिमुकली आता पूर्णपणे सुधारून घरी परतली असून कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील मनस्वी पाटील (वय १.५ वर्षे) या चिमुकलीला अचानक तीव्र तापासह झटके येऊ लागले. झटके आल्यानंतर तिच्या शरीराची हालचाल कमी झाली, प्रतिसाद मंदावला तसेच बेशुद्धावस्थेसारखी स्थिती निर्माण झाली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तातडीने तिला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल होताच बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार यांच्यासह तज्ज्ञांच्या पथकाने तातडीने तपासणी सुरू केली. चिमुकलीची प्रकृती गंभीर असल्याने पाठीतील पाण्याची तपासणी (लंबर पंक्चर), सीटी स्कॅन व एमआरआय करून मेंदूतील स्थितीची सखोल पाहणी करण्यात आली. सर्व तपासण्यांच्या आधारे चिमुकलीला मेंदूज्वर असल्याचे निदान झाले.

निदान होताच तिला बालरोग अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. येथे तज्ज्ञ डॉक्टर, अनुभवी नर्सिंग स्टाफ व अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या सहाय्याने २४ तास निरीक्षणाखाली उपचार सुरू करण्यात आले. झटके नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार, मेंदूतील सूज कमी करण्यासाठी उपचार, ताप नियंत्रण, द्रवपदार्थ व पोषण व्यवस्थापन अशा सर्वांगीण उपचारांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली.

सततच्या तज्ज्ञ निरीक्षणामुळे आणि वेळेवर मिळालेल्या योग्य उपचारांमुळे अवघ्या आठवडाभरात चिमुकलीचे झटके पूर्णतः नियंत्रणात आले. हळूहळू तिच्या शरीराची हालचाल सुधारली, शुद्धीवर येण्याची प्रक्रिया वेगाने झाली आणि प्रतिसाद पूर्ववत होऊ लागला. प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्यानंतर सर्व तपासण्या समाधानकारक आल्याने तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

या यशस्वी उपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. अभिजीत अरमाळ, डॉ. निरज जगताप यांच्यासह भारती झोपे, हिरामण लांडगे व संपूर्ण नर्सिंग स्टाफने विशेष परिश्रम घेतले.

कोट :
“मेंदूज्वर हा लहान मुलांसाठी अतिशय गंभीर आजार असून वेळेवर उपचार न मिळाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या चिमुकलीला योग्य वेळी रुग्णालयात आणल्यामुळे अचूक निदान व तातडीचे उपचार शक्य झाले. पालकांनी मुलांमध्ये अचानक ताप, झटके किंवा शुद्धी कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तज्ज्ञ रुग्णालयात दाखल करावे.”
डॉ. अभिजीत अरमाळ, निवासी डॉक्टर, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय, जळगाव


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.