Contact Banner

जळगाव पोलीस दलाच्या ताफ्यात ७२ लाखांची बुलेटप्रूफ कार; व्हीआयपी सुरक्षेला बळ


 जळगाव पोलीस दलाच्या ताफ्यात ७२ लाखांची बुलेटप्रूफ कार; व्हीआयपी सुरक्षेला बळ

लेवाजगत न्युज | जळगाव :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक सुरक्षा वाहने दाखल होत आहेत. यामध्ये सुमारे ७२ लाख रुपयांची बुलेटप्रूफ कार तसेच साडेचार कोटी रुपयांची मोबाइल व ड्रोन सिग्नल जॅमर व्हॅन यांचा समावेश असून, यामुळे जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

राज्यातील नऊ जिल्ह्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येकी दोन वाहने अशा एकूण १८ वाहने वितरित केली जात असून, त्यात जळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून जळगाव पोलीस दलाकडे बुलेटप्रूफ कार उपलब्ध नव्हती. तांत्रिक बिघाडामुळे जुनी कार भंगारात काढण्यात आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्हीआयपींच्या दौऱ्यावेळी इतर जिल्ह्यांकडून बुलेटप्रूफ कार मागवावी लागत होती.

नव्याने प्राप्त होणारी बुलेटप्रूफ कार टोयोटा फॉर्च्युनर कंपनीची असून, तिच्या काचा व पत्रे बंदुकीच्या गोळ्यांना भेदू न शकणारी आहेत. ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, व्हीआयपी दौऱ्यांच्या सुरक्षेसाठी तिचा प्रामुख्याने वापर केला जाणार आहे.

यासोबतच जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात प्रथमच मोबाइल व ड्रोन सिग्नल जॅमर व्हॅन दाखल होत आहे. या व्हॅनच्या मदतीने मोबाईल, ड्रोन तसेच अन्य वायरलेस सिग्नल निष्क्रिय करता येणार आहेत. वाढत्या ड्रोनवापराच्या पार्श्वभूमीवर ही व्हॅन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

मोठ्या सार्वजनिक सभा, संवेदनशील कार्यक्रम तसेच व्हीआयपी दौऱ्यांदरम्यान या जॅमर व्हॅनचा वापर करण्यात येणार असून, त्यामुळे संभाव्य धोके वेळीच टाळता येतील. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे जळगाव जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.