लेवा पाटीदार स्नेहसंमेलनाने चंद्रपूरमध्ये समाजबंध अधिक दृढ
लेवा पाटीदार स्नेहसंमेलनाने चंद्रपूरमध्ये समाजबंध अधिक दृढ
लेवाजगत न्युज | चंद्रपूर :-
लेवा पाटीदार सस्नेह मिलनाचा आजचा कार्यक्रम केवळ एक आयोजन न राहता, सक्षम, खंबीर आणि संस्कारक्षम समाज उभारण्याच्या दिशेने टाकलेले एक अर्थपूर्ण पाऊल ठरला. सुटसुटीत नियोजन, शिस्तबद्ध मांडणी आणि आत्मीयतेचा ओलावा यामुळे हा सोहळा सर्वार्थाने संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने छोट्या-छोट्या बाबींकडे दिलेले सूक्ष्म लक्ष विशेष भावले. अस्सल लेवा पाटलांची जेवणपंगत, पंगतीची रचना, बट्ट्यांची मांडणी आणि गावाकडील वांग्यापासून तयार केलेली वांग्याची भाजी यांसारख्या पारंपरिक चवींनी उपस्थितांच्या मनात घर केले. वरण-बट्टी, आमसूलची कढी आणि जिलेबी असा पारंपरिक मेनू सर्वांच्या विशेष पसंतीस उतरला.
यामध्ये भगिनींनी साकारलेला अस्सल खानदेशी तडका हा जणू कार्यक्रमाचा आत्माच ठरला. त्यांच्या प्रेमळ आपुलकीची उब संपूर्ण परिसरात दरवळत होती.
या स्नेहसंमेलनात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यांच्या अनुभवसंपन्न जीवनप्रवासाला व समाजासाठी दिलेल्या योगदानाला मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच शाळांमध्ये उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या लहान मुलांचाही सत्कार करण्यात आला. या गौरवामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास व प्रेरणा वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.
कार्यक्रमात लहान व मोठ्यांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले.
या स्नेहसंमेलनाच्या यशामागे चंद्रपूर येथील लेवा पाटीदार मंडळाच्या मान्यवरांनी घेतलेले अथक परिश्रम, तळमळ आणि संघभावना मोलाची ठरली. गडचिरोली, चंद्रपूर, भद्रावती, मुल तसेच परिसरातील विविध भागांतून आलेल्या जळगाव जिल्ह्यातील लेवा पाटीदार समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
या उपक्रमाच्या निमित्ताने समाजबांधवांच्या भेटीगाठी घडल्या, नातेसंबंध अधिक दृढ झाले आणि समाजाबद्दलची आपुलकी अधिक बळावली.
सावदा येथील रहिवासी व चंद्रपूर येथे आरोग्य सेवा देणारे डॉ. अच्युत पाटील, तसेच सावदा येथीलच रहिवासी आणि चंद्रपूर पोलीस दलात सेवा बजावणारे श्री. किरण पाटील व त्यांची संपूर्ण टीम यांनी कार्यक्रमाच्या यशात मोलाचे योगदान दिले.
या सुंदर, प्रेरणादायी व समाजएकतेला बळ देणाऱ्या उपक्रमासाठी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन व ऋणनिर्देशपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत