ONGCच्या तेल विहिरीतून वायू गळती, स्फोटाचा मोठा आवाज; आग लागताच लोकांची पळापळ, हाय अलर्ट लागू
ONGCच्या तेल विहिरीतून वायू गळती, स्फोटाचा मोठा आवाज; आग लागताच लोकांची पळापळ, हाय अलर्ट लागू
लेवाजगत न्युज आंध्र प्रदेश :- आंध्र प्रदेशच्या एका गावात ऑईल अँड नॅचरल गॅस लिमिटेडच्या तेलाच्या विहिरीतून वायू गळती झाली आहे. वायू गळतीनंतर आग लागल्याची घटना घडली. वायू गळती झाल्यावर स्थानिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. ही घटना डॉ. बी. आर. आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील मलिकिपुरम भागातील इरुसुमंडा गावात घडली. वायू गळतीमुळे आग लागल्यानंतर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तेल विहिरीत देखभाल, दुरूस्तीचं काम सुरु असताना वायू गळती झाली. तितक्यात मोठा स्फोट झाला. यानंतर वायू आणि खनिज तेलाचा एक मोठा फवारा हवेत उडाला. गळती इतकी भीषण होती की नैसर्गिक वायूनं लगेच पेट घेतला. आगीच्या ज्वाळा पाहून ग्रामस्थ आणि अधिकारी घाबरले. गावाच्या आसपासच्या परिसरात धूर पसरला. त्यामुळे दृश्यमानता अचानक घटली आणि एकच खळबळ उडाली.
स्थानिकांची सुरक्षा लक्षात घेता अधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवरुन घोषणा केल्या. आसपास असलेल्या तीन गावातील लोकांना विजेचा वापर न करण्याच्या, कोणतंही उपकरण सुरु न करण्याच्या आणि स्टोव्ह, शेगडी न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्राम पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक प्रशासनानं ग्रामस्थांना तातडीनं गावं सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलं. यानंतर ग्रामस्थ त्यांच्या जनावरांना घेऊन सुरक्षित स्थळी गेले. परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत.
स्फोटाची माहिती मिळताच ओएनजीसीचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वायू गळती रोखण्याचे आणि आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. स्थानिकांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन उपाययोजना केल्या जात आहेत. वरिष्ठ जिल्हाधिकारी आणि ओनएजीसीचे अधिकारी स्वत: घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
मलिकिपुरममध्ये याआधीही वायू गळतीची घटना घडली आहे. मार्च २०२५ मध्ये मलिकिपुरमच्या केशनपल्लीत गॅस गॅदरिंग स्टेशन परिसरात वायू गळती झाली होती. यामुळे नऊ जण आजारी पडले. स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागला. संयुक्त गोदावरी जिल्ह्यांमध्ये वायू गळतीच्या घटना सातत्यानं घडत असतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत