Pune Mahapalika Election Results : EVM मशीन बदलल्याचा आरोप; रुपाली पाटील आक्रमक, मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ
Pune Mahapalika Election Results : EVM मशीन बदलल्याचा आरोप; रुपाली पाटील आक्रमक, मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ
लेवाजगत न्युज | पुणे :-
पुणे महापालिका निवडणुकांच्या निकालादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांनी EVM मशीन बदलल्याचा गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. या आरोपानंतर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल येथील मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली.
मतमोजणी जवळपास तासभर थांबली
मशीन बदलल्याचा आरोप करत रुपाली पाटील यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मतमोजणी जवळपास एक तासाहून अधिक काळ बंद ठेवण्यात आली होती. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत राडा घातल्याचे चित्र पाहायला मिळाले.
प्रभाग क्रमांक २६ मधून उमेदवारी
रुपाली पाटील ठोंबरे पुणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक २६ सह दोन जागांवरून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये युती झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी त्यांना एबी फॉर्म मिळाला होता.
कोण आहेत रुपाली पाटील ठोंबरे?
रुपाली पाटील या पुणे महापालिकेतील माजी नगरसेविका आहेत. त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेवकपद भूषवले आहे.
२०२१ मध्ये मनसेला रामराम ठोकत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता.
रुपाली विरुद्ध रुपाली संघर्ष
रुपाली पाटील आणि राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांच्यातील अंतर्गत वाद गेल्या काही दिवसांपासून उफाळून आला होता. पक्षातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार, अशा चर्चांना उधाण आले होते.
दरम्यान, त्यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याने ‘घड्याळ’ सोडून शिवसेनेत प्रवेश करणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या.
स्टार प्रचारक आणि प्रवक्त्यांच्या यादीतून वगळलं
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जाहीर केलेल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत रुपाली पाटील यांना स्थान देण्यात आले नव्हते.
त्याआधीही प्रवक्त्यांच्या यादीत त्यांचा समावेश नव्हता. त्यामुळे त्यांची पक्षातून गच्छंती निश्चित मानली जात असतानाच, अखेर त्यांना उमेदवारी मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत