नियमबाह्य कामामुळे सावदा कन्या शाळेच्या मैदानाची नासधूस; ठेकेदार,निधी व एक कोटींच्या कामांवर संशय
नियमबाह्य कामामुळे सावदा कन्या शाळेच्या मैदानाची नासधूस; ठेकेदार,निधी व एक कोटींच्या कामांवर संशय
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
सावदा येथील सावदा नगरपालिका संचालित कन्या शाळेच्या सुमारे ११ हजार चौरस फूट मैदानाच्या मजबुतीकरण व विकासाच्या नावाखाली नियमबाह्य पद्धतीने करण्यात आलेल्या कामामुळे मैदानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे गटनेते राजेश वानखेडे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केल्याने हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.
या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, सदर मैदानाच्या कामाबाबत कन्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना देण्यात आलेल्या अधिकृत पत्रात केवळ M/s. Kay Buildcon, छत्रपती संभाजीनगर असे कंपनीचे नाव नमूद आहे. मात्र ठेकेदाराचे नाव, संपूर्ण पत्ता, दूरध्वनी क्रमांक यांचा कुठलाही उल्लेख नाही. विशेष म्हणजे, या कामासाठी कोणत्या निधीतून खर्च करण्यात आला, कामाचे अंदाजपत्रक किती आहे, याची कोणतीही माहिती शाळा प्रशासन किंवा स्थानिक नगरपालिका प्रशासनाला देण्यात आलेली नाही. तसेच या कामासाठी पालिकेकडून आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्रही घेतलेले नसल्याचे समोर आले आहे.
आणखी गंभीर बाब म्हणजे, हे काम प्रत्यक्षात संबंधित कंपनीने न करता खलिल शेख नावाच्या एका त्रयस्थ व्यक्तीने सुरू केल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती वरणगाव येथील रहिवासी असल्याचे समजते. ठेकेदाराने दिलेल्या पत्रात नमूद केलेल्या कामाच्या स्वरूपानुसार प्रत्यक्षात काम न होता, पूर्वी व्यवस्थित असलेल्या मैदानाचीही मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे शाळेतील विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत असून, दररोजच्या प्रार्थना कार्यक्रमांसह शालेय उपक्रमांवर परिणाम झाला आहे. त्यातच २६ जानेवारीचा राष्ट्रीय कार्यक्रम जवळ आल्याने ध्वजारोहण व इतर कार्यक्रम कसे पार पडणार, असा प्रश्न शाळा प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
याच धर्तीवर नगरपालिकेच्या आणखी एका शाळेतही असेच काम झाल्याची माहिती असून, त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम न होता संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण झाल्याचा दाखला देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या दोन्ही शाळांतील सुमारे एक कोटी रुपयांच्या कामांचा नेमका तपशील काय, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. मुख्याधिकारी भूषण वर्मा, नगराध्यक्षा रेणुका पाटील तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी या नियमबाह्य कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करणार का, याकडे आता संपूर्ण सावदा शहराचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत