स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी येथे विविध उपक्रम उत्साहात
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गोदावरी अभियांत्रिकी येथे विविध उपक्रम उत्साहात
लेवाजगत न्यूज जळगाव:-
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवक दिना च्या निमित्ताने गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जळगाव यांच्या वतीने सोमवार, दिनांक १२ जानेवारी रोजी विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत सकाळी भव्य विद्यार्थी–शिक्षक रॅली तर दुपारच्या सत्रात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग जुना खेडी रोड परिसर व अयोध्यानगर परिसर – श्री प्लाझा – तृप्ती कॉर्नर – देशमुख डेअरी – गणपती मंदिर – इच्छापूर्ती हनुमान मंदिर – यमुनानगर – मनुदेवी मंदिर असा होता. संपूर्ण मार्गावर रॅली शांततामय व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. या रॅलीदरम्यान स्वदेशीचा आत्मा, आत्मनिर्भर भारत, युवकांची भूमिका, राष्ट्रउभारणी व स्वामी विवेकानंदांचे विचार या विषयांवर प्रेरणादायी घोषणा देण्यात आल्या. “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका”, “युवकशक्ती राष्ट्रशक्ती” अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. रॅलीचे आयोजन मयूर कोळी, गणेश कोलते, प्रणव थोरात, नितेश पाटील, वैभव ठाकरे, केवलनाथ व कोमल कोळी या विद्यार्थ्यांनी डॉ. अनिलकुमार विश्वकर्मा व प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या केले.
यानंतर दुपारच्या सत्रात महाविद्यालयाच्या सभागृहात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस मुख्यालयातील रविंद्र तायडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समवेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, अधिष्ठाता डॉ. तुषार कोळी, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापकवर्ग व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित विचार मांडले. वैष्णवी चौधरी, मयूर कोळी, सानिका कासार, ऋषिका माहूरकर व गणेश कोलते या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. याच कार्यक्रमात विद्यार्थी सम्यक सुराणा याने स्वामी विवेकानंद यांची वेशभूषा परिधान केली, तर विद्यार्थिनी ट्विंकल धांडे हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा साकारून उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
प्रमुख पाहुणे रविंद्र तायडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना युवक कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पोलीस विभागामार्फत समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दिली. त्यांनी सायबर सिक्युरिटी व सायबर फसवणूक याबाबत विद्यार्थ्यांनी व समाजाने कसे जागरूक राहावे, यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमात बोलताना प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी आयोजित उपक्रमांचे कौतुक केले तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांचे अनुकरण करावे, असे आवाहन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिका कारंडे व अनुष्का बऱ्हाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रणव थोरात यांनी मानले. या सर्व उपक्रमांमुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास, सामाजिक भान व जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली असून गोदावरी अभियांत्रिकी जळगाव यांची सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील (सचिव), डॉ. केतकी पाटील (सदस्य), डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) व डॉ. अनिकेत पाटील यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत