भोगी पर्वानिमित्त सावदा गांधी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाजीपाल्याची देखणी सजावट
भोगी पर्वानिमित्त सावदा गांधी चौकातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाजीपाल्याची देखणी सजावट
लेवाजगत न्यूज सावदा : संक्रांतीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच भोगी पर्वाच्या निमित्ताने गांधी चौकातील येथे माऊली विठ्ठल-रुक्मिणी मातांची अत्यंत आकर्षक व आगळ्यावेगळ्या संकल्पनेतील सजावट करण्यात आली होती. या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्णपणे ताज्या भाजीपाल्याचा वापर करून देवांचे मनोहारी रूप साकारण्यात आले होते.
या सजावटीत वांगे, बटाटे, लिंबू, कांदे, पालक, मेथी, कोथिंबीर, कांद्याची पात तसेच विविध हंगामी भाज्यांचा सुयोग्य वापर करण्यात आला होता. भाजीपाल्यांच्या नैसर्गिक रंगसंगतीमुळे विठ्ठल-रुक्मिणी मातांचे रूप अधिकच खुलून दिसत होते. शेतकऱ्यांच्या कष्टांचे प्रतीक असलेल्या भाजीपाल्यांतून भोगी पर्वाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले होते.
भोगी व मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली ही सजावट पाहण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी उसळली होती. परिसरातील नागरिकांसह आलेल्या भक्तांनी दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले. अनेकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत मंदिर समिती व सजावट करणाऱ्यांचे अभिनंदन केले.
परंपरा, श्रद्धा आणि लोकजीवनाशी निगडित असा हा उपक्रम भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, भोगी पर्व साजरे करण्याचा हा उपक्रम सावदा शहरात विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत