बनाना क्लस्टरसाठी निविदेतील अटी जाचक; गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद
बनाना क्लस्टरसाठी निविदेतील अटी जाचक; गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद
लेवाजगत न्यूज जळगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यासाठी दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या बनाना क्लस्टरसाठी राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला ब्रेक लागला असून निविदेतील अटी जाचक असल्यामुळे गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण झाले आहेत. मात्र या अडचणी दूर करून योजना मार्गी लावली जाईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
देशातील १२ क्लस्टरमध्ये जळगाव जिल्ह्यातील बनाना क्लस्टरचा समावेश करण्यात आला होता. कृषी क्षेत्रासाठी सुमारे दीड लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कापूस व केळी पिकांच्या प्रक्रियेसाठी नवीन अॅग्रो क्लस्टरची घोषणा करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक अपेक्षित असून गुंतवणूकदारांनी किमान ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांची सबसिडी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत केळीशी संबंधित आजार, उपचार, प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन केंद्र उभारले जाणार आहे.
दरम्यान, निविदेतील अटी कठोर असल्याने गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ. रेखा चौधरी आदी उपस्थित होते. केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देताना रक्षा खडसे यांनी विकसित भारत आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्याच्या दिशेने विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
युवक, महिला, शेतकरी आणि गरीब या चार घटकांवर केंद्रित विकासाचे धोरण राबविण्यात येत असून राज्यातील हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी विमानतळ विकासाला निधी देण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रालाही चालना देण्यात येणार असून क्रिकेटसह इतर खेळांसाठी प्रोत्साहन दिले जाईल. तसेच शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर’ लॅब उभारल्या जाणार असून हजारो मार्गदर्शकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
बनाना क्लस्टर प्रकल्प मार्गी लागल्यास जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असून प्रक्रिया उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मिती वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत