रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक
रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांची बैठक
लेवाजगत न्युज रावेर:- रावेर लोकसभा मतदारसंघांतर्गत रेल्वे विभागामार्फत विविध विकास प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये जामनेर–पाचोरा–बोदवड वाढीव रेल्वे लाईन तसेच भुसावळ–खंडवा तिसरी व चौथी रेल्वे लाईन यांचा समावेश आहे. या कामांमुळे अनेक शेतकरी बाधित झाले असून त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे, जिल्हाधिकारी श्री रोहन घुगे तसेच रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या सविस्तर जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी विशेषतः बोदवड व भुसावळ तालुक्यांतील तसेच वरणगाव परिसरातील रेल्वे रुळालगत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आरओबी (Railway Over Bridge) व आरयूबी (Railway Under Bridge) उभारणी, शेतात जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत