चिनावल येथे स्वर्गीय शालिनी अशोक साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदात्त देणगी
चिनावल येथे स्वर्गीय शालिनी अशोक साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदात्त देणगी
लेवाजगत न्यूज चिनावल -रावेर तालुक्यातील चिनावल येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर शाळेस सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक दगडू साळुंके (जिल्हा परिषद ठाणे) यांनी त्यांच्या पत्नी स्वर्गीय शालिनी अशोक साळुंके यांच्या स्मरणार्थ ५५ इंच एलईडी टीव्ही व १ लाख रुपयांची कायम ठेव अशी उदात्त आर्थिक देणगी प्रदान केली.
अशोक साळुंके यांनी जिल्हा परिषद ठाणे येथे ३४ वर्षे ६ महिने शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली असून ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उत्कृष्ट, दूरदृष्टीपूर्ण व आदर्शवत मानले जाते. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने परिश्रम घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आदर्श निर्माण केला.
स्वर्गीय शालिनी साळुंके या भिवंडी तालुका, जिल्हा ठाणे येथे उपशिक्षिका म्हणून ३५ वर्षे कार्यरत होत्या. २ जुलै २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ देण्यात आलेल्या १ लाख रुपयांच्या ठेवीवरील व्याजातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी मदत केली जाणार आहे.
या उदात्त कार्याबद्दल संस्थेच्या वतीने देणगीदारांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अध्यक्ष सुनील भास्कर महाजन यांनी डिजिटल युगात एलईडी टीव्हीचे शैक्षणिक महत्त्व अधोरेखित करत शाळेत तयार करण्यात आलेल्या डिजिटल क्लासरूममुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. डिजिटल वर्गाचे शैक्षणिक महत्त्व कविता नेमाडे यांनी प्रभावीपणे विशद केले.
मान्यवरांच्या हस्ते नूतन प्राथमिक विद्यामंदिर, चिनावल येथे डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. डिजिटल अध्यापनाचे प्रात्यक्षिक उपशिक्षक संतोष काळे यांनी सादर केले. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उच्च दर्जाच्या करण्यात येत असून त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गणेश बाविस्कर यांनी केले, तर सूत्रसंचालन हर्षाली कोल्हे यांनी केले. विद्यार्थ्यांच्या वतीने भावना नेमाडे यांनी स्वागतगीत सादर करून वातावरण भावपूर्ण केले. कार्यक्रमाच्या शेवटी सपना ढाके यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळ चिनावलचे चेअरमन खेमचंद्र गोवर्धन पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र वामन फालक, सचिव गोपाळ देवचंद पाटील, शालेय समिती सदस्य निळकंठ भोजराज चौधरी, संचालक दामोदर यादव महाजन, अनिल सुधाकर किरंगे, विनायक कमलाकर महाजन, मनोहर विठ्ठल पाटील, नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एच. आर. ठाकरे, उपमुख्याध्यापिका मीनल नेमाडे तसेच हर्षल साळुंके (एमएसआरटीसी वाहक) उपस्थित होते.
कार्यक्रमाची सजावट व व्यवस्था शिक्षक विनिता नारखेडे, मिलिंद गारसे, कविता पाटील, एन. एन. महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी सिंचन नेहते व चंद्रकांत कुरकुरे यांनी केली.
स्वर्गीय शालिनी साळुंके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेली ही देणगी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत