डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही पथनाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संदेश; शिवजयंती जल्लोषात
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अवतरली शिवशाही
पथनाट्याच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा संदेश; शिवजयंती जल्लोषात
लेवाजगत न्यूज जळगाव – येथील येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाने जणू शिवशाही अवतरल्याची अनुभूती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करत यांच्या स्वराज्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवित शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य बॅचतर्फे ‘शिवपर्व-2026’ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. माया आर्विकर, प्रा. डॉ. बापूराव बिटे, डॉ. विजय बाविस्कर, आशिष भिरूड, गोपाळ भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत शिवरायांचा सजीव देखावा
शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. वारकरी संप्रदायाची परंपरा दर्शविणारा देखावाही मिरवणुकीत सहभागी झाला. छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा निसर्ग भैराम यांनी साकारली, तर विठ्ठलाची भूमिका निरज वाठोरे आणि रुक्मिणीची भूमिका आरती बेले हिने साकारली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने परिसरात उत्साह संचारला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
पथनाट्याद्वारे सामाजिक जनजागृती
एमबीबीएस द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यात स्त्री अत्याचार, व्यसनाधीनता, वृद्धाश्रमांची वाढती प्रवृत्ती आणि शेतकऱ्याच्या कष्टाचे मोल यांसारख्या समकालीन विषयांवर प्रभावी भाष्य करण्यात आले. पियूष बिसेन, सुदेश शिंदे, पुष्कर लोंढे, मिहीर पाटील, कृणाल छोले, सिद्धेश वंजारी, पार्थ वैद्य, वेदांत वानवे, अमितेश मडसे, शिलान नगराळे, ऐश्वर्या रत्नपारखी, निशिका मंडोरे, संजीवनी जाधव, आकांक्षा पवार, विश्रृता चव्हाण आणि आयुषी बकाने या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी या पथनाट्याचे उत्स्फूर्त कौतुक केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत