Contact Banner

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा


धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

पूर्वा चौधरीचे तिहेरी सुवर्ण, काजल सोनवणेचे सुवर्ण-रौप्य यश

लेवाजगत न्युज जळगाव : एस. एस. व्ही. पी. एस. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, धुळे येथे महाविद्यालयांच्या विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे अंतर्गत पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर व जळगाव विभागातील संलग्न महाविद्यालयांच्या या स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उंचावले.

तृतीय वर्ष एआय अँड डीएस अभियांत्रिकी शाखेतील पूर्वा नारायण चौधरी हिने तायक्वांदो (५३ किलो) गटात प्रथम क्रमांक मिळवला. त्याचबरोबर वुशू (५५ किलो) व कराटे (५२ किलो) या दोन्ही प्रकारांतही सुवर्णपदक पटकावत तिने तिहेरी विजेतेपदाची ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. तिच्या वेगवान, तांत्रिक व आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे परीक्षक व प्रेक्षकांकडून तिचे विशेष कौतुक करण्यात आले.

तसेच तृतीय वर्ष एआय अँड डीएस शाखेतील काजल कैलास सोनवणे हिनेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कराटे (४५ किलो) प्रकारात प्रथम तर वुशू (४३ किलो) प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावत महाविद्यालयासाठी दुहेरी यश संपादन केले. सातत्यपूर्ण सराव व जिद्दीमुळे हे यश शक्य झाले असल्याचे क्रीडा विभागाने नमूद केले.

या दोन्ही खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. जयंत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या दणदणीत यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विशेष अभिनंदन करून पुढील आंतरविद्यापीठ व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयात क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या उल्लेखनीय यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील (डीएम कार्डिओलॉजिस्ट) तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपली भक्कम ओळख निर्माण केल्याचे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.