गर्भवती महिलांनो आता प्रसूतीच्या वेदना विसरा..! डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पेनलेस डिलीव्हरी सुविधा
गर्भवती महिलांनो आता प्रसूतीच्या वेदना विसरा..!
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पेनलेस डिलीव्हरी सुविधा
लेवाजगत न्युज जळगाव : प्रसूतीदरम्यान होणाऱ्या तीव्र वेदनांमुळे अनेक गर्भवती महिलांमध्ये भीतीचे वातावरण असते. मात्र ही भीती दूर करणारी आधुनिक पेनलेस डिलीव्हरी (वेदनारहित प्रसूती) सुविधा जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे महिलांना प्रसूतीच्या असह्य वेदनांपासून मोठा दिलासा मिळणार असून सुरक्षित मातृत्वाचा अनुभव घेणे अधिक सुलभ होणार आहे.
पेनलेस डिलीव्हरी ही आधुनिक व सुरक्षित वैद्यकीय पद्धत असून प्रसूतीच्या वेळी पाठीमध्ये (स्पाईनमध्ये) विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या वेदना मोठ्या प्रमाणात कमी होतात किंवा पूर्णपणे थांबतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेमुळे आई व बाळ दोघांनाही कोणताही धोका होत नाही. ही सुविधा अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ यांच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रसूतीपूर्व तपासणीपासून ते प्रसूतीनंतरच्या काळजीपर्यंत सर्व प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडतात.
नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण वाढण्यास मदत
पेनलेस डिलीव्हरीमुळे महिलांचा मानसिक तणाव कमी होतो आणि प्रसूतीबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होतो. प्रसूतीच्या भीतीमुळे अनेकदा सिझेरियन शस्त्रक्रियेचा पर्याय निवडला जातो; मात्र या सुविधेमुळे नॉर्मल डिलीव्हरीचे प्रमाण वाढण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. विशेष म्हणजे ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली असून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनाही आधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, हा सामाजिक हेतू यामागे आहे. उपचार प्रक्रियेत आवश्यक तपासण्या, औषधोपचार आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन समाविष्ट आहे.
तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास उपलब्ध
रूग्णालयात विभागप्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. मृदुला मुंगसे, डॉ. रश्मी संघवी, डॉ. ऐश्वर्या, डॉ. पल्लवी आणि डॉ. प्राजक्ता यांची तज्ज्ञ टीम कार्यरत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ उपचार उपलब्ध करून दिले जातात. गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र प्रसूती कक्ष, स्वच्छता, सुरक्षितता तसेच नवजात बाळासाठी आवश्यक सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत.
कोट :
“आधुनिक वैद्यकीय युगात महिलांनी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्यात, असे अजिबात नाही. पेनलेस डिलीव्हरी ही सुरक्षित व प्रभावी पद्धत असून आई आणि बाळाच्या आरोग्यास कोणताही धोका नाही. सर्वसामान्य महिलांनाही या आधुनिक उपचारांचा लाभ मिळावा, या उद्देशाने ही सुविधा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिकाधिक महिलांनी या सुविधेचा लाभ घेऊन सुरक्षित आणि आनंददायी मातृत्वाचा अनुभव घ्यावा,” असे आवाहन डॉ. ऐश्वर्या यांनी केले.
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवेत एक सकारात्मक बदल घडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत