रावेरजवळ भीषण अपघात; दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
रावेरजवळ भीषण अपघात; दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
लेवाजगत न्युज रावेर :-
रावेर शहराजवळील सावदा रोडवर बुधवारी (दि. ४ फेब्रुवारी) दुपारी दोन मोटरसायकलींच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.
रावेर शहराबाहेरील सावदा रोडवर बिजासनी माता मंदिरापासून काही अंतरावर दुपारी हा अपघात झाला. या घटनेत विनय भालेराव (वय २६)हा आपल्या मोटरसायकलवरून रावेरच्या दिशेने येत होता, तर शुभम लोखंडे (वय २०)हा रावेरहून विवरकडे जात असताना दोघांच्या मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती की शुभम लोखंडे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या विनय भालेराव याला तातडीने उपचारासाठी रावेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला भुसावळ येथे हलविण्यात येत असताना दुर्दैवाने रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकाकुल वातावरण आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच रावेर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास रावेर पोलीस करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत