Contact Banner

जळगावात भरधाव डंपरची धडक; नागरिकांचा संताप, वाहनावर दगडफेक

 

जळगावात भरधाव डंपरची धडक; नागरिकांचा संताप, वाहनावर दगडफेक


लेवाजगत न्युज जळगाव : शहरातील कालिका माता चौकात शुक्रवारी दुपारी भरधाव डंपरने एका वृद्धाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय 56, रा. तळी चौक, जुने जळगाव, ह.मु. ज्ञानदेवनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले.


मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाकर पाटील बाजारातून भाजीपाला घेऊन घरी जात असताना डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात गुंतलेला होता. याच निष्काळजीपणामुळे डंपरने पाटील यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर डंपरचे चाक त्यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


अपघाताची बातमी पसरताच स्थानिक नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले. संतप्त जमावाने डंपरची काच फोडून वाहनावर दगडफेक केली. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला. नागरिकांनी या चौकात सीसीटीव्ही बसवण्याची, सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची आणि अवजड वाहनांवर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे.


दरम्यान, पोलिसांनी डंपर चालकाविरोधात कारवाईचे आश्वासन दिले असून पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.