मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय
मारक्रम–मिलरच्या फटकेबाजीचा जलवा; दक्षिण आफ्रिकेचा कॅनडावर ५७ धावांनी दणदणीत विजय
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील गट ‘ड’ मधील नवव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅनडावर ५७ धावांनी शानदार विजय मिळवला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद २१३ धावांचा भक्कम डोंगर उभारला आणि त्यानंतर अचूक गोलंदाजीच्या जोरावर कॅनडाला ८ बाद १५६ धावांत रोखले.
नाणेफेक जिंकून कॅनडाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; मात्र एडन मारक्रमने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत ३२ चेंडूंमध्ये १० चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ५९ धावांची तुफानी खेळी केली. क्विंटन डी कॉकने २२ चेंडूंमध्ये २५, रायन रिकेल्टनने २१ चेंडूंमध्ये ३३ धावा जोडल्या. अखेरीस डेव्हिड मिलरने २३ चेंडूंमध्ये नाबाद ३९, तर ट्रिस्टन स्टब्सने १९ चेंडूंमध्ये नाबाद ३४ धावा करत डावाला वेग दिला.
कॅनडाकडून अंश पटेलने ३ बळी घेतले, तर दिलप्रीत बाजवाने १ गडी बाद केला.
२१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनडाची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्याच षटकात दोन फलंदाज बाद झाले. दिलप्रीत बाजवा शून्यावर, तर युवराज समरा १२ धावांवर माघारी परतला. नवनीत धालीवालने ४९ चेंडूंमध्ये ७ चौकार व १ षटकाराच्या मदतीने ६४ धावांची झुंजार खेळी केली, तर हर्ष ठाकेरने ३३ धावांचे योगदान दिले; मात्र इतर फलंदाज अपयशी ठरल्याने कॅनडाचा डाव १५६ धावांवर आटोपला.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगिसानी एनगिडीने ४ षटकांत ३१ धावांत ४ बळी घेत घातक मारा केला. मार्को यान्सेनने २, तर कागिसो रबाडा व कॉर्बिन बॉश यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. उत्कृष्ट गोलंदाजीबद्दल एनगिडीला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या विजयासह दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील आपली विजयी मोहीम दमदारपणे कायम ठेवली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत