Contact Banner

पळसखेडे मिराचे येथे समृद्ध शेतीवर आधारित कृषी मेळावा संपन्न


palaskhede-mirache-yethe-samruddha-shetivar-adharit-krushi-melava-sampann


 पळसखेडे मिराचे येथे समृद्ध शेतीवर आधारित कृषी मेळावा संपन्न

लेवाजगत न्यूज जळगांव-डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या मोहाडी व पळसखेडा येथील कृषीदूतांमार्फत पळसखेडे मिराचे येथे आयोजित करण्यात आलेल्या समृद्ध शेतीवर आधारित कृषी मेळाव्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद लाभला. या मेळाव्यात कापूस, मका व केळी पिकांवरील समृद्ध शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. बी. एम. गोणशेटवाड (RAWE व AIA कार्यक्रम समन्वयक, कृषी विस्तार शिक्षण विभाग) यांनी केले. मेळाव्याचे सूत्रसंचालन कृषीदूत रोशन नरोडे व सिद्धेश जैन यांनी केले. तालुका कृषी अधिकारी मा. श्री. जितेंद्र पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पळसखेडा येथील सरपंच आशाताई संजय पवार होत्या.

यावेळी प्रा. पी. एस. देवरे (RAWE व AIA कार्यक्रम अधिकारी), प्रा. बी. एम. गोणशेटवाड, डॉ. प्रीती दातीर (सहाय्यक प्राध्यापिका, कृषी विस्तार शिक्षण विभाग) तसेच उद्यानविद्या तज्ज्ञ प्रा. के. ए. बनसोडे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती चंद्रशेखर काळे, मोहाडी गावचे सरपंच मा. श्री. दत्तात्रय पाटील, पळसखेडा उपसरपंच मा. श्री. संदीप काळे व प्रगतशील शेतकरी भरतसिंग राजपूत उपस्थित होते.

मार्गदर्शक म्हणून तुकाराम निकुळे व प्रगतशील शेतकरी अनिल चौधरी उपस्थित होते. प्रा. शरद पाटील (जामनेर) यांनी कृषीदूतांना मार्गदर्शन केले. तसेच कृषीदूत अमन मोगल, किरण इंगळे व ऋषिकेश निळे यांनी शेतकऱ्यांना समृद्ध शेतीविषयी माहिती दिली.

मेळाव्यात कापूस, मका व केळी पिकांसाठी सुधारित लागवड तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण तसेच शाश्वत व बाजाराभिमुख शेती पद्धतींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तर सत्रामुळे शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.

शेतकऱ्यांना समृद्ध शेतीची संकल्पना प्रत्यक्ष शेतावर प्रभावीपणे राबवण्यासाठी सक्षम करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. या मार्गदर्शनामुळे उत्पादनवाढीसह खर्चात बचत साध्य होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांनी कृषीदूतांचे कौतुक केले. शेवटी प्रा. बी. एम. गोणशेटवाड यांनी उपस्थित ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे आभार मानून मेळाव्याचा समारोप केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.