‘माझी चूक नव्हती…’ सुसाईड नोटमधील वेदना उघड-प्राचार्याच्या मारहाणीमुळे जळगावात बी.फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या
प्राचार्याच्या मारहाणीमुळे जळगावात बी.फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या
‘माझी चूक नव्हती…’ सुसाईड नोटमधील वेदना उघड
प्रतिनिधी जळगाव-येथील मध्ये शिकणाऱ्या बी. फार्मसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याने रविवारी सायंकाळी नेहरू नगर येथील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. श्याम प्रभाकर पाटील (वय १९, रा. बोदवड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून त्याच्या खिशातून सापडलेल्या सुसाइड नोटमध्ये प्राचार्यांकडून झालेल्या मारहाणीचा उल्लेख करण्यात आला आहे.
या प्रकरणी विद्यार्थ्याचे वडील प्रभाकर गोपाळ पाटील यांच्या तक्रारीवरून प्राचार्य यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच संबंधित प्राचार्य बेपत्ता झाले असून त्यांचा मोबाईल नॉट-रिचेबल येत आहे.
श्याम हा बोदवड येथील रहिवासी असून जळगावातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो नेहरू नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. शनिवारी (दि. १४) कॉलेजमधील एका विद्यार्थ्यासोबत त्याचा वाद झाला होता. या घटनेची माहिती देण्यासाठी श्याम प्राचार्यांकडे गेला असता, त्याला पीव्हीसी पाइपने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. ही बाब त्याने रविवारी दुपारी आपल्या वडिलांना व चुलत काकांना फोनवर सांगितली होती. सोमवारी प्राचार्यांना भेटू, असे कुटुंबीयांनी त्याला सांगितले होते; मात्र त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास श्यामने गळफास घेतल्याची माहिती रूममालकाने त्याच्या जुळ्या भावाला दिली.
घटनेची माहिती मिळताच पालक व नातेवाईक जळगावात दाखल झाले. प्राचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. अखेर सोमवारी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भूषण कोते करीत आहेत.
दरम्यान, सुसाइड नोटमध्ये श्यामने “माझी काही चूक नव्हती… मला खूप मारहाण करण्यात आली… मी गेल्यानंतर सीसीटीव्ही तपासा,” असा उल्लेख करत आई-वडील व कुटुंबीयांची माफी मागितली आहे. या घटनेमुळे जळगावातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत