Contact Banner

वरूडमध्ये भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा जागीच मृत्यू

varudmadhe-bhishan-apghat-shalkari-mulisah-pach-janancha-jagich-mrityu


वरूडमध्ये भीषण अपघात; शाळकरी मुलीसह पाच जणांचा जागीच मृत्यू

लेवाजगत न्यूज अमरावती-जिल्हातील वरूड तालुक्यात आज अत्यंत भीषण अपघात घडला. वरूड–राजुरा बाजार रोडवरील रेल्वे क्रॉसिंगसमोर भरधाव इलेक्ट्रिक एसटी बसने प्रवासी ऑटोला मागून जोरदार धडक दिल्याने रक्ताचा सडा पडला. या दुर्घटनेत १३ वर्षीय शाळकरी मुलीसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची अवस्था अत्यंत भीषण असून काहींचे अवयव घटनास्थळी विखुरल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले. घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित एसटी बस वरूडवरून वर्ध्याच्या दिशेने जात होती. दरम्यान, राजुरा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगजवळ समोर असलेल्या प्रवासी ऑटोला बसने पाठीमागून जबर धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते धडक इतकी जोरदार होती की ऑटोचे अक्षरशः दोन तुकडे झाले आणि त्यातील मृतदेहांचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले. काही काळ घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते.

या अपघातात माही प्रविण मांगुळकर (वय १३, रा. वाडेगाव), कैलास घनश्याम नागदेवे (वय ४२, रा. वाडेगाव), हरीभाऊ दौलत शिंदे (वय ८३, रा. वघाळ) आणि चिंतामन सदाशिवराव नागदेवे (वय ६०, रा. वाडेगाव) यांचा मृत्यू झाला असून आणखी एकाचा समावेश असल्याची माहिती आहे. तसेच तीन ते चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. एसटी बसमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच वरूड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी बस व चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

शाळकरी विद्यार्थिनीसह एकाच गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने वाडेगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून ग्रामीण भागातील रस्ते सुरक्षा आणि वेगमर्यादेच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.