विद्यार्थी स्वाभिमान आंदोलनाला यश; प्राचार्य निलंबित, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
विद्यार्थी स्वाभिमान आंदोलनाला यश; प्राचार्य निलंबित, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य
लेवाजगत न्यूज जळगांव -गुलाबराव देवकर फार्मसी महाविद्यालयातील प्राचार्यांकडून झालेल्या कथित अमानुष मारहाणीमुळे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप आणि वेदनेचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर (अभाविप) तर्फे “विद्यार्थी स्वाभिमान आंदोलन” छेडण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेत मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले. संबंधित विद्यार्थ्याचे कुटुंबीयही आंदोलनात उपस्थित राहून न्यायाची मागणी करत होते. अभाविपने संस्थाचालक व प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशी, संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती.
आंदोलनाच्या तीव्रतेनंतर महाविद्यालय प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्राचार्यांच्या निलंबनाची घोषणा केली असून विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या—तक्रार निवारण यंत्रणेचे सक्षमीकरण आणि समुपदेशन केंद्र सुरू करणे—मान्य केल्या आहेत. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान, अभाविपच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निवेदन सादर केले. संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
अभाविप देवगिरी प्रदेश मंत्री डॉ. वरुणराज नन्नवरे म्हणाले, “घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांच्या सन्मान आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर अभाविप कोणतीही तडजोड करणार नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व मानसिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. संस्था व प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत मागण्या मान्य केल्या याचे स्वागत आहे; मात्र भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे.”
या वेळी डॉ. वरुणराज नन्नवरे, जळगाव महानगरमंत्री चिन्मय महाजन, सहमंत्री शारदा पाटील, वरद पांढारकर, शुभम बारी, आदित्य जाधव यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत