Contact Banner

अडावदजवळ रावेर–सुरत‘लालपरी’चा थरार; धावत्या बसचे चाक निखळले, दुचाकीस्वार गंभीर जखमी

 

adavd-javal-raver-surat-lalpari-bus-tharar-chak-nikhalle-duchakiswar-gambhir-jakhmi

अडावदजवळ रावेर–सुरत‘लालपरी’चा थरार; धावत्या बसचे चाक निखळले, दुचाकीस्वार गंभीर जखमी

चोपडा, दि. २८ (सा.वा.) : अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर महामार्गावर अडावदजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या ‘लालपरी’ बसचा मोठा अपघात होता-होता टळल्याची धक्कादायक घटना घडली. रावेर–सुरत मार्गावरील धावत्या बसचे मागील चाक अचानक निखळल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारास धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून बसमधील सुमारे २५ प्रवाशांचे प्राण सुदैवाने वाचले.

रावेर–सुरत बस (क्रमांक एमएच २० बीएल २१७८) अडावदमार्गे प्रवाशांना घेऊन जात असताना काबरा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. चालक साईडच्या मागील चाकाचे सर्व आठ नट अचानक तुटल्याने चाक बसपासून वेगळे झाले. निखळलेले चाक वेगाने समोरून येणाऱ्या दुचाकीवर आदळले.

या अपघातात गुलाबराव मुरलीधर पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या उजव्या गुडघ्याला जबर मार लागला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर प्रशांत पाटील, पंकज पाटील, संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चोपडा येथे हलविण्यात आले.

दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत प्रवासी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. बसमधील सर्व प्रवासी थोडक्यात बचावले असून अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.

घटनेची माहिती मिळताच चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील व अडावद वाहतूक नियंत्रक भूषण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिक माहिती घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.