सौ.हिमा सुधाकर चौधरी राज्यस्तरीय ‘हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित
सौ.हिमा सुधाकर चौधरी राज्यस्तरीय ‘हिरकणी’ पुरस्काराने सन्मानित
लेवाजगत न्यूज फैजपूर : येथील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सौ. हिमा सुधाकर चौधरी यांना समिज्ञा फाउंडेशन, नाशिक यांच्या वतीने वर्ष 2026 चा राज्यस्तरीय ‘हिरकणी’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
राज्यभरातून निवड झालेल्या 21 महिलांमध्ये जळगाव जिल्ह्यातील त्या एकमेव ठरल्याने जिल्हावासीयांसाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
सौ. चौधरी या सौ. कुसुमताई माध्यमिक विद्यालय, फैजपूर येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवितात. बदलत्या सामाजिक वातावरणात विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांना प्रतिबंध घालण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असून, विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक व भावनिक सुदृढीकरण व्हावे यासाठी त्या कार्यरत आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तिमत्व विकास शिबिरे, बालचेतना शिबिरे, सूर्यनमस्कार व योग स्पर्धा, प्राणायाम उपक्रम, तसेच हिंदू सण-उत्सवांचे शास्त्रोक्त मार्गदर्शन, श्रीमद्भगवद्गीता स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, श्लोक व मंत्र पाठांतर यांसारखे विविध उपक्रम राबवले जातात. याशिवाय महिलांसाठीही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
धनाजी नाना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असून, नुकतेच मुंबई येथील प्रख्यात व्याख्याते संजय जोशी यांच्या ‘जीवनलक्षी गीता’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत समिज्ञा फाउंडेशनतर्फे मानवता कॅन्सर हॉस्पिटल येथे शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शिरीषदादा चौधरी, प्रा. डॉ. सुधाकर काशिनाथ चौधरी, तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूरचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत