आखातातील तणावाचा परिणाम : हजारो कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले शेतकरी व निर्यातदारांना मोठ्या आर्थिक फटक्याची भीती
आखातातील तणावाचा परिणाम : हजारो कंटेनर जेएनपीए बंदरात अडकले
शेतकरी व निर्यातदारांना मोठ्या आर्थिक फटक्याची भीती
लेवाजगत न्यूज उरण | प्रतिनिधी : इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात वाढत चाललेल्या तणावाच्या झळा आता भारतालाही बसू लागल्या आहेत. आखाती देशांकडे निर्यात होणारा भारतीय माल घेऊन जाणारे हजारो कंटेनर मागील आठवडाभरापासून मुंबईनजीकच्या जेएनपीए बंदरात अडकून पडल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी व निर्यातदारांना मोठ्या आर्थिक फटक्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जेएनपीए बंदरातून दररोज हजारो कंटेनरची हाताळणी केली जाते. मात्र सध्या मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे जाणाऱ्या जहाजांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. परिणामी केळी, द्राक्षे, भाज्या, मासळी तसेच चिकन-मटण यांसारख्या नाशवंत मालाचे सुमारे १२०० हून अधिक कंटेनर बंदरात अडकून पडले आहेत.
एका कंटेनरमध्ये साधारणपणे २२ टन माल असतो. रमजानच्या महिन्यात भारतातील केळी व द्राक्षांना आखाती देशांमध्ये मोठी मागणी असते. सांगलीसह राज्यातील विविध भागांतून पाठविण्यात आलेला माल बंदरातच अडकून पडल्याची माहिती निर्यातदारांनी दिली.
नाशवंत माल अनेक दिवस बंदरात पडून राहिल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा माल विदेशात पाठविता आला नाही तर निर्यातदारांना तो स्थानिक बाजारपेठेत विकण्याची वेळ येऊ शकते. मात्र स्थानिक बाजारात कमी दर मिळाल्याने शेतकरी व निर्यातदारांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
कंटेनर परत आणण्यासाठी लाखोंचा खर्च
जेएनपीए बंदरात अडकलेल्या कंटेनरमधील माल पुन्हा स्थानिक बाजारपेठेत आणण्यासाठी प्रत्येक कंटेनरमागे सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. शेतकऱ्यांकडून रोखीने खरेदी केलेला माल स्थानिक बाजारात कमी दराने विकण्याची वेळ निर्यातदारांवर येऊ शकते. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती असल्याचे अनिता कार्गो मूव्हर्सचे निर्यातदार जितेंद्र परमार यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत