Contact Banner

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून धरणे होणार गाळमुक्त; शेतकऱ्यांना गाळ नेण्याचे आवाहन

 

amdar-amolbhau-javale-pudhakartutun-dharane-galmukt-shetkaryanna-gal-neyanyache-avahan


आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून धरणे होणार गाळमुक्त; शेतकऱ्यांना गाळ नेण्याचे आवाहन


लेवाजगत न्यूज प्रतिनिधी  फैजपूर :रावेर यावल मतदारसंघात सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजनेच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, फैजपूर यांच्या कार्यालयात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.


बैठकीत रावेर मतदारसंघातील मध्यम व लघु प्रकल्प, पाझर तलाव, सिमेंट नाला बंधारे तसेच उथळ नाल्यांमधील साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलस्त्रोतांमध्ये साचलेला गाळ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने विनामूल्य आपल्या शेतात नेऊन शेतीसाठी वापरावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.


तसेच, जवळील जलस्त्रोतांमधून गाळ वाहून नेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, फैजपूर तसेच संबंधित विभागाकडे मागणी अर्ज सादर करावेत. अर्ज प्राप्त होताच शेतकऱ्यांना तात्काळ परवानगी देण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


यावल तालुक्यासाठी शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे (मो. ९८८१२९००४) यांच्याशी, तर रावेर तालुक्यासाठी नायब तहसीलदार संजय तायडे (मो. ९८२३९७७५९३) यांच्याशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.


या बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार (यावल व रावेर), तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता (सावदा), मोर धरण उपविभाग हिंगोणा येथील उपअभियंता, जिल्हा परिषद सिंचन उपविभाग रावेरचे अधिकारी, वनविभागाचे आरएफओ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.